डिझेल अभावी ठप्प १०२ रुग्णवाहिका ; गर्भवतीची जीवावर बेतलेली प्रतीक्षा !
डिझेल अभावी ठप्प १०२ रुग्णवाहिका ; गर्भवतीची जीवावर बेतलेली प्रतीक्षा !आरोग्य केंद्रातील दुर्लक्षामुळे गंभीर रुग्णांची हेळसांड – औषध साठा संपुष्टात.
कोल्हापूर प्रतिनिधी विजय बकरे
ग्रामीण भागातील तातडीची आरोग्यसेवा पुरविण्यासाठी शासनाने सुरू केलेली १०२ रुग्णवाहिका सेवा डिझेलअभावी अक्षरशः ठप्प झाली आहे. त्यामुळे दुर्गम भागातील रुग्णांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत असून, गंभीर अवस्थेतील रुग्णांचे हाल होत आहेत. वेतवडे (ता. गगनबावडा) येथील नऊ महिन्यांची गर्भवती महिला उपचारासाठी निवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाली असता तिच्या तपासणीत हिमोग्लोबिन केवळ ५.२ इतकेच असल्याचे आढळले. स्थिती गंभीर असल्याने डॉक्टरांनी तिला तातडीने कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला.
मात्र, त्या वेळी १०८ रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. परिणामी आरोग्य केंद्रात असलेली १०२ रुग्णवाहिका वापरण्याचा निर्णय घेतला गेला ; परंतु धक्कादायक बाब म्हणजे त्या वाहनात डिझेलच नव्हते. त्यामुळे ती रुग्णवाहिका देखील रुग्णास घेऊन जाण्यासाठी तयार नव्हती. त्यामुळे गंभीर अवस्थेतील गर्भवती महिलेला वेळेवर पुढील उपचार मिळण्यास विलंब झाला.
दरम्यान, निवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात मधुमेह, रक्तदाब, कॅल्शियम तसेच कफ सिरप यांसारख्या अत्यावश्यक औषधांचा साठा संपल्याची माहिती कर्मचाऱ्यांकडून समोर आली आहे. या निष्काळजीपणामुळे रुग्णसेवा अक्षरशः ठप्प झाली असून परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
ग्रामीण आरोग्यसेवेकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन १०२ रुग्णवाहिका सेवेला नियमित डिझेल पुरवठा करावा व औषधसाठा तात्काळ उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.
“१०२ रुग्णवाहिकांसाठी आवश्यक इंधनाचा निधी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही निवडे प्राथमिक आरोग्य केंद्राला नियमित पुरविला आहे. या प्रकरणात निष्काळजीपणा कोठे झाला, याची तपासणी केली जाणार असून संबंधितांना सक्तीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच इंधनाच्या खर्चाचा हिशोब तपासला जाईल.”
- डॉ. विशाल चोकाककर – तालुका आरोग्य अधिकारी.
“निवडे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे १०२ रुग्णवाहिकेसाठीचा इंधन निधी आम्ही वारंवार मागणी करूनही प्राप्त झालेला नाही. त्यामुळे रुग्णांना हलविण्यासाठी आम्हाला १०८ रुग्णवाहिकेवरच अवलंबून राहावे लागत आहे. इंधनाच्या अभावामुळे आपत्कालीन सेवांवर ताण येत असून रुग्णसेवेत अडथळे निर्माण होत आहेत,”
- डॉ. मनिषा पोवाळकर, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र निवडे.
No comments: