यड्राव को-ऑप बँकेला कै. अॅड.शामरावजी शिंदे विशेष पुरस्कार.
यड्राव को-ऑप बँकेला कै. अॅड.शामरावजी शिंदे विशेष पुरस्कार
जयसिंगपूर/प्रतिनिधी-
कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि. कोल्हापूर व अॅड. शामरावजी शिंदे सत्यशोधक सहकारी बँक लि. कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी दिला जाणारा कै. अॅड. शामरावजी शिंदे विशेष पुरस्कार, सन 2024- 2025 सालासाठी यड्राव को-ऑप बँक लि. यड्राव ला मिळाला आहे. हा विशेष पुरस्कार दरवर्षी आर्थिक दृष्ट्या सक्षमता, रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे पालन, ग्राहकांना उत्तम सेवा, नावीन्यपूर्ण ठेवी व कर्ज योजना, निरंतर नफा, व्यवसाय वाढ, ई. निकष पालन करणार्या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वोत्तम सहकारी बँकेला दिला जातो.
कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि. कोल्हापूरच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये हा पुरस्कार यड्राव बँकेला प्रदान करण्यात आला. यड्राव बँकेचे अध्यक्ष अजय पाटील यड्रावकर, उपाध्यक्ष दिलीप मगदुम, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीशैल नायकुडे व विकास अधिकारी प्रवीण म्हैसाळकर यांनी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष निपुण कोरे, उपाध्यक्ष विठ्ठल मोरे तसेच अॅड. शामरावजी शिंदे सत्यशोधक सहकारी बँक लि. कोल्हापूरचे अध्यक्ष महेंद्र शिंदे व संचालक मंडळ यांचेहस्ते पुरस्कार स्विकारला. पुरस्काराचे स्वरूप परितोषिक, प्रमाणपत्र आणि रोख रु. 25 हजार असे आहे. कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नागराळे यांनी पुरस्काराच्या निकषांचे विश्लेषण केले.
यड्राव बँकेचे अध्यक्ष अजय पाटील यड्रावकर यांनी प्रतिक्रिया देताना, बँकेने नेहमीच ग्राहक सेवेला प्राधान्य दिले असून यासाठी अद्ययावत डिजिटल व मोबाइल बँकिंग सेवा, एटीएम सेवा आत्मसात केल्या आहेत. तसेच बँकेच्या चार जिल्ह्यातील कार्यक्षेत्रातील ग्राहकांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी नाविन्यपूर्ण ठेवी व कर्ज योजना, बँकेकडून राबविल्या गेलेल्या राज्य व केंद्र सरकारच्या सबसिडी व व्याजपरतावा आधारित कर्ज योजना, बँकेची आर्थिक सक्षमता, बँकेवरील सामान्य ग्राहकांचा असलेला विश्वास, याची दखल आज जिल्हा पातळीवर घेतली गेल्याचे प्रतिपादन केले. यासोबतच बँकेचा एकूण वाढता व्यवसाय, कार्यक्षेत्र विस्तार लक्षात घेता बँक लवकरच रु. 500 कोटीचा टप्पा पार करून कोल्हापूर जिल्ह्यामधील एक अग्रगण्य बँक म्हणून नावारूपास येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोल्हापूर जिल्ह्यातील बँकिंग क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी यड्राव बँकेचे अभिनंदन व कौतुक केले. याप्रसंगी बँक्स असोसिएशनचे सभासद, सहकारी बँकांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच अधिकारी उपस्थित होते.
No comments: