Header Ads

सेवानिवृत्त समादेशक खुशाल सपकाळे यांच्यावर अपसंपदेचा गुन्हा दाखल.

 सेवानिवृत्त समादेशक खुशाल सपकाळे यांच्यावर अपसंपदेचा गुन्हा दाखल.

-----------------------------

संस्कार कुंभार 

-----------------------------

शाहूपुरी पोलीस ठाण्यातील लाच प्रकरणानंतर उघड चौकशीत तब्बल १ कोटी ६६ लाखांची बेहिशेबी मालमत्ता उघड


अॅन्टी करप्शन ब्युरोची कारवाई; कोल्हापूर व मुंबईत घरझडती सुरू.

कोल्हापूर : 

शाहूपुरी पोलीस ठाण्यात १७ जुलै २०१८ रोजी लाच प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सेवानिवृत्त समादेशक खुशाल विठ्ठल सपकाळे (भारत राखीव बटालियन क्रमांक ३, कोल्हापूर) यांच्यावर पुन्हा एकदा कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर तब्बल १ कोटी ६६ लाख ३३ हजार ९९१ रुपयांची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे अॅन्टी करप्शन ब्युरोच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. ही बेहिशेबी संपत्ती त्यांच्या वैध उत्पन्नाच्या ७५.९८ टक्के अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.



 लाच प्रकरणानंतर उघड चौकशी


२०१८ मध्ये शाहूपुरी पोलीस ठाण्यात सपकाळे यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७, १२, १३ (१)(ड), १३(२) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानांची झडती घेऊन अपसंपदेबाबत सविस्तर उघड चौकशी करण्यात आली.


या चौकशीसाठी अॅन्टी करप्शन ब्युरो कोल्हापूरच्या पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांनी पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्री. शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पूर्ण केला. चौकशीत सपकाळे यांनी सेवानिवृत्तीनंतर व आधीही बेहिशेबी संपत्ती जमा केल्याचे निष्पन्न झाले.





 सपकाळे व पत्नीवर गुन्हा नोंद


चौकशी अहवालानुसार खुशाल विठ्ठल सपकाळे व त्यांची पत्नी हेमांगी खुशाल सपकाळे यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम १३ (१)(ई) सह १३(२) तसेच भारतीय दंड संहिता कलम १०९ प्रमाणे लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अनुषंगाने कोल्हापूर व मुंबईतील त्यांच्या निवासस्थानांची घरझडती सुरू असून बेहिशेबी मालमत्तेचा ताळेबंद तयार करण्याचे काम सुरू आहे.





 अपर पोलीस अधीक्षकांकडे पुढील तपास


या प्रकरणाचा पुढील तपास अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे परिक्षेत्र) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. संपूर्ण मालमत्तेचा तपशील, व्यवहार व उत्पन्न स्रोताची चौकशी केली जाणार आहे.

No comments:

Powered by Blogger.