भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात वृद्ध महिला गंभीर जखमी; नगरपालिकेच्या कामकाजावर पुन्हा प्रश्नचिन्ह
भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात वृद्ध महिला गंभीर जखमी; नगरपालिकेच्या कामकाजावर पुन्हा प्रश्नचिन्ह
**********************
जयसिंगपूर / प्रतिनिधी :
**********************
जयसिंगपूर शहरात भटक्या कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला असून आज पहाटे या समस्येने पुन्हा एकदा विक्राळ रूप धारण केले. रेल्वे स्टेशन परिसरात राहणाऱ्या रेखा सुभाषचंद्र गांधी (वय 70) या वृद्ध महिलेस भटक्या कुत्र्याने हल्ला केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.
ही घटना आज पहाटे साडेसातच्या सुमारास घडली. गंभीर जखमी अवस्थेत नागरिकांच्या मदतीने त्यांना तत्काळ सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, अशी माहिती समाजसेवक शंकर नाळे यांनी दिली. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत असताना, जयसिंगपूर नगरपालिकेच्या उदासीनतेबद्दल पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहेत. अनेक वेळा तक्रारी करूनही ठोस उपाययोजना न झाल्याने नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.
"कुत्र्यांचे निर्बंध कोण घालणार? एखाद्या निरपराधाचा बळी गेल्यावरच प्रशासन जागे होणार का?"
स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

No comments: