Header Ads

बनावट नोटकांड उधळणाऱ्या महात्मा गांधी चौक पोलिसांचा सन्मान

 बनावट नोटकांड उधळणाऱ्या महात्मा गांधी चौक पोलिसांचा सन्मान.

-------------------------------------

मिरज तालुका : प्रतिनिधी राजू कदम.

----------------------------------------

कोल्हापूर :

चहाच्या टपरीपासून सुरू झालेला बनावट नोटांचा खेळ थेट सांगली पोलिस मुख्यालयापर्यंत पोहोचला आणि या प्रवासात मिरज येथील महात्मा गांधी चौक पोलिसांनी आपली छाप ठळकपणे उमटवली. पाचशे रुपयांच्या बनावट नोटा छापून त्या बाजारात खपवण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा पर्दाफाश केल्याबद्दल सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी या पोलिस पथकाची पाठ थोपटत सन्मान केला.

-------------------------

कोल्हापूर व मुंबईपर्यंत धाड.

----------------------+--------

महात्मा गांधी चौक पोलिसांनी बनावट चलन व्यवहाराचा धागा पकडत कोल्हापूर आणि मुंबई येथे जाऊन आंतरजिल्हा टोळीवर कारवाई केली. कोल्हापूरातील चहाच्या दुकानातून सुरू असलेल्या या रॅकेटमध्ये सामील असलेल्या कंपनीसह एकूण ९ जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. यामध्ये कोल्हापूर येथील एका पोलिसाचाही समावेश असल्याने या प्रकरणाने अधिकच खळबळ उडाली.

प्रशस्तीपत्र आणि रिवार्डने गौरव

या धाडसी कारवाईचे मोल ओळखत, सांगली पोलीस मुख्यालयात बुधवारी झालेल्या गुन्हे आढावा बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या हस्ते महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे व त्यांच्या संपूर्ण टिमला प्रशस्तीपत्र आणि रिवार्ड देऊन गौरविण्यात आले.

याआधी कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनीही या कारवाईबद्दल महात्मा गांधी चौक पोलिसांचा विशेष सत्कार करून प्रशस्तीपत्र दिले होते.

बनावट नोटांच्या सुळसुळाटाच्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी चौक पोलिसांनी उघडकीस आणलेले हे रॅकेट आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात असून, या पथकाच्या शिताफी, नियोजन आणि धाडसाची चर्चा संपूर्ण सांगली–कोल्हापूर परिसरात रंगत आहे.

No comments:

Powered by Blogger.