खुटाळवाडी येथे भीषण अपघात सैन्य भरतीहून परतणाऱ्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू
खुटाळवाडी येथे भीषण अपघात
सैन्य भरतीहून परतणाऱ्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू
-------------------------------------प्रतिनिधी – रोहित पास्ते, मलकापूर.
-------------+------+------+------
शाहुवाडी तालुक्यातील खुटाळवाडी येथील ख्रिश्चन वसाहतीजवळील वळणावर झालेल्या भीषण अपघातात सैन्य भरतीहून परतणाऱ्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. पारस आनंदा परिट व सूरज जानदेव उंड्रीकर (दोघेही रा. आंबर्डे, ता. शाहुवाडी) अशी मृत तरुणांची नावे आहेत. या घटनेची नोंद शाहुवाडी पोलीस ठाण्यात झाली असून आंबर्डे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पारस परिट व सूरज उंड्रीकर हे दोघेही कोल्हापूर येथे सुरू असलेल्या सैन्य भरतीसाठी गेले होते. ग्राऊंड पूर्ण करून ते दोघेही स्प्लेंडर मोटारसायकलवरून (क्र. MH-09 GS-1609) आंबर्डेकडे परतत होते. दरम्यान, खुटाळवाडी येथील ख्रिश्चन वसाहतीजवळील वळणावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकने (क्र. MH-09 L-2925) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की दोघांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर ट्रक चालकाने ट्रक घटनास्थळीच सोडून पलायन केल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच शाहुवाडी पोलीस ठाण्याचे पो.उपनिरीक्षक शिरसाट तसेच महामार्ग पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह मलकापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.
पारस व सूरज हे दोघेही एकाच गल्लीत राहणारे जिवलग मित्र होते. सैन्य भरतीतून भविष्य घडवण्याचे स्वप्न डोळ्यांत घेऊन कोल्हापूरला गेलेल्या या दुर्दैवी तरुणांचे असे अकाली निधन गावकरी व नातेवाईकांसाठी मोठा धक्का ठरला आहे. आंबर्डे गावावर शोककळा पसरली आहे.

No comments: