डॉक्टरचा शिरोली येथे अपघातात दुर्दैवी मृत्यू आई–मुलाची कायमची ताटातूट ; अज्ञात ट्रकचा धडक
डॉक्टरचा शिरोली येथे अपघातात दुर्दैवी मृत्यू
आई–मुलाची कायमची ताटातूट ; अज्ञात ट्रकचा धडक
आईच्या उपचारासाठी गावी निघालेल्या आजरा तालुक्यातील कागिनवाडी येथील तरुण डॉक्टरचा शिरोली येथे झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात आज सकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास पुणे–बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शिरोली ग्रामपंचायत हद्दीतील पंचगंगा नदीजवळ असलेल्या पिराच्या दर्ग्यासमोर घडला.
अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरचे नाव प्रसाद दिनकर बुगडे (वय २९, रा. कागिनवाडी, ता. आजरा) असे आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रसाद बुगडे हा मिरज येथे वैद्यकीय व्यवसाय करत होता. आईच्या डोळ्यांचे ऑपरेशन करायचे असल्याने तो आज सकाळी आपल्या दुचाकी (क्र. MH 09 GV 8059) वरून मिरजहून दवाखान्याकडे निघाला होता. शिरोली गावाच्या हद्दीत पिराच्या दर्ग्याजवळ आला असता अज्ञात ट्रकने त्याच्या दुचाकीस पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात प्रसाद जागीच ठार झाला.
प्रसाद याला तीन बहिणी असून वडिलांचे सहा वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. कुटुंबातील सर्व जबाबदारी त्याच्यावर होती. तो अभ्यासात अत्यंत हुशार होता. दहावीपर्यंतचे शिक्षण गावात, बारावी गडहिंग्लज येथे तर वैद्यकीय शिक्षण कवठेमहांकाळ येथे पूर्ण केले होते. तो मिरज येथे आपल्या डॉक्टर बहिणीकडे राहत होता. बहिणीच्या पाठबळावरच त्याने वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले होते.
आईच्या डोळ्यांवर उपचार करण्यासाठी त्याने आईला फोन करून तावडे हॉटेल येथे येण्यास सांगितले होते. तेथून दोघे कणेरीमठ येथील दवाखान्यात जाणार होते. मात्र पिराच्या दर्ग्यापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या तावडे हॉटेलपर्यंत पोहोचण्याआधीच आईची भेट न होताच प्रसादचा अपघाती मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

No comments: