टीईटी सक्तीविरोधात कोल्हापुरात शिक्षकांचा विराट मोर्चा!.
टीईटी सक्तीविरोधात कोल्हापुरात शिक्षकांचा विराट मोर्चा!.
-----------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
विजय बकरे
-----------------------------------
कोल्हापूरात आज प्राथमिक, माध्यमिक तसेच आश्रमशाळांमधील हजारो शिक्षकांनी टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) अनिवार्य करण्याच्या न्यायालयीन निर्णयाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढत आपल्या हक्कांसाठी जोरदार ताकद दाखवली. राज्यातील लाखो शिक्षकांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार आल्याने जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ आणि विविध शिक्षक संघटनांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आयोजित करण्यात आला.
पहिली ते आठवीच्या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांना आता टीईटी अनिवार्य केल्याने दीर्घकाळ अध्यापन सेवा बजावणाऱ्या शिक्षकांचे भविष्य धोक्यात येत असल्याची भावना मोठ्या प्रमाणावर व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील शिक्षकांनी आज घोषणा, फलक, आणि ठाम आवाजासह सरकारपर्यंत आपला रोष पोहोचवला.
मोर्च्यात पुणे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी उपस्थित राहून शिक्षकांच्या मागण्यांना ठाम पाठिंबा दिला. शासनाने हा गंभीर प्रश्न तातडीने निकाली काढावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच दादा लाड, भरत रसाळे, प्रमोद तोंडकर, विलास चौगले, सुधाकर निर्मळे, स्वाभिमानी शिक्षक सेवाभावी संघाचे अशोक पाटील, शैक्षणिक व्यासपीठाचे प्रतिनिधी आणि अनेक मान्यवरांनी सहभाग नोंदवत शिक्षकांच्या न्याय्य लढ्याला बळ दिले.
नेत्यांनी शासनाला सादर केलेल्या निवेदनात दीर्घकाळ अध्यापन करणाऱ्या अनुभवी शिक्षकांना टीईटीमधून सूट द्यावी किंवा त्यांना धोक्यात आणणारी सक्ती तातडीने रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली. टीईटीच्या सक्तीमुळे हजारो शिक्षक नोकरी गमावण्याच्या भयामुळे मानसिक तणावात असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
शिक्षकांचा हा मोर्चा एकजुटीचे, हक्कांसाठी लढण्याच्या जिद्दीचे आणि शिक्षणव्यवस्थेतील अन्यायकारक निर्णयाला दिलेल्या ठाम प्रत्युत्तराचे प्रतीक ठरला. शासनाने या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन योग्य उपाययोजना करावी, अशी अपेक्षा मोर्चात सहभागी सर्व शिक्षक व नेत्यांनी व्यक्त केली.

No comments: