महात्मा गांधी स्मृतिदिनी ‘ड्राय डे’ नियमांना हरताळ? जयसिंगपूर–शिरोळ तालुक्यात खुलेआम मद्यविक्री सुरू
महात्मा गांधी स्मृतिदिनी ‘ड्राय डे’ नियमांना हरताळ? जयसिंगपूर–शिरोळ तालुक्यात खुलेआम मद्यविक्री सुरू
जयसिंगपूर / शिरोळ :
महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त संपूर्ण देशभरात ३० जानेवारी रोजी ‘ड्राय डे’ पाळला जातो. तसेच २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनीही मद्यविक्रीवर बंदी असते. मात्र जयसिंगपूर व शिरोळ तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व पोलीस प्रशासन या नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे.
कोल्हापूर–सांगली रोडलगत असणाऱ्या काही लॉजिंग व बारमध्ये ‘ड्राय डे’ असतानाही सर्रास दारू विक्री सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेष म्हणजे काही लॉजिंगमध्ये वरच्या मजल्यावर मद्यविक्री सुरू असून बाहेरून पाहता लॉजिंग सुरू असल्याचेच फलक लावण्यात आले आहेत.
२६ जानेवारी रोजी ‘ड्राय डे’ असताना एका पोलीस कर्मचाऱ्याने संबंधित बार चालकास याबाबत जाब विचारला असता, त्या ठिकाणी काम करणाऱ्या वेटरने त्या कर्मचाऱ्यावर खोटा आरोप करत स्वतःला मारहाण करून घेतल्याची व नंतर तक्रार दाखल केल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे.
या प्रकारामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून नियम मोडणाऱ्या बार मालकांवर कारवाई होणार की नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस अधीक्षक कार्यालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

No comments: