जयसिंगपूरमधील यादवनगर अतिक्रमणाच्या विळख्यात.
जयसिंगपूरमधील यादवनगर अतिक्रमणाच्या विळख्यात.
---------------------------------
जयसिंगपूर प्रतिनिधी
नामदेव भोसले
---------------------------------
रहदारी ठप्प; रुग्णवाहिकेचा रस्ता बंद, पालिका प्रशासनावर निष्क्रियतेचे गंभीर आरोप.
जयसिंगपूर शहरातील पालिका हद्दीतील यादवनगर परिसर सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात अडकला असून, येथील मुख्य अंतर्गत रस्ता अक्षरशः गळ्याला फास ठरत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी झालेल्या बेकायदेशीर अतिक्रमणामुळे रस्ता कमालीचा अरुंद झाला असून, वाहनांची ये-जा जवळपास ठप्प झाली आहे. परिणामी नागरिकांना रोजच्या रोज वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, सन २०१९ पासून या अतिक्रमणाबाबत पालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने ठोस कारवाई केलेली नाही, असा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे. अतिक्रमणामुळे या परिसरात घंटागाडी, रुग्णवाहिका, अग्निशमन व आरोग्य सेवांची वाहने पोहोचू शकत नसल्याने आपत्कालीन परिस्थितीत मोठा धोका निर्माण झाला आहे.
यादवनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिक वास्तव्यास असून, अस्वच्छता, गर्दी व अपुऱ्या मोकळ्या जागेमुळे संसर्गजन्य आजार पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, या गंभीर प्रश्नाकडे पालिका प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप होत आहे.
या संदर्भात पालिकेकडे विचारणा केली असता, उडवाउडवीची उत्तरे देत वेळकाढूपणा केला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. राजकीय दबावामुळे प्रशासनाने ‘गांधारीची भूमिका’ घेतल्याची चर्चा शहरात सुरू असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, तातडीने अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांकडून देण्यात येत आहे. प्रशासन आता तरी जागे होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

No comments: