पोलिस कॉन्स्टेबलकडून प्लॉट हडप करण्याचा आरोप; तरुणावर जीवघेणा हल्ला, कुटुंबीयांना धमक्या.पोलीस ठाण्यात तक्रार घेण्यास नकार; नागरिकांत संताप.
पोलिस कॉन्स्टेबलकडून प्लॉट हडप करण्याचा आरोप; तरुणावर जीवघेणा हल्ला, कुटुंबीयांना धमक्या.पोलीस ठाण्यात तक्रार घेण्यास नकार; नागरिकांत संताप.
------------------------------------
जयसिंगपूर प्रतिनिधी
------------------------------------
जयसिंगपूर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल सागर सूर्यवंशी व दानोळी चे पोलीस पाटील प्रशांत नेजकर यांच्यावर पोलिस पदाचा गैरवापर करून दानोळी येथील प्लॉट हडप करण्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. दानोळी (ता. शिरोळ) येथील रहिवासी अंकुश जयसिंग कुंभार यांनी याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिली आहे.
तक्रारीनुसार, कुंभार यांच्या आईच्या मालकीचा दानोळी येथील प्लॉट बळकावण्यासाठी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने दबाव टाकण्यास सुरुवात केली होती. यास विरोध केल्याने दि. 28 डिसेंबर 2025 रोजी कवठेसार रोड येथे दोन अनोळखी इसमांच्या मदतीने अंकुश कुंभार यांच्यावर डोळे, कान, पाठ व डोक्यावर गंभीर मारहाण करण्यात आली. तसेच तक्रार केल्यास घर उद्ध्वस्त करण्याची व जीवघेणी धमकी देण्यात आली असल्याचा आरोप आहे.
या हल्ल्यानंतर आरोपी पोलीस कर्मचाऱ्याने कुंभार यांच्या घरी जाऊन दार फोडण्याचा प्रयत्न केला असून, त्यांच्या आई-वडील व भाच्यालाही “तक्रार केली तर मुलगा उद्या दिसणार नाही” अशी धमकी दिल्याचा गंभीर आरोप तक्रारीत नमूद आहे.
या संपूर्ण प्रकाराबाबत दि. 29 डिसेंबर 2025 रोजी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता, आरोपी पोलीस कर्मचारी असल्याने तक्रार घेण्यास नकार देण्यात आल्याचा आरोप कुंभार यांनी केला आहे. त्यामुळे पीडित कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पोलीस कर्मचारीच जर कायद्याचा गैरवापर करत असतील तर सामान्य नागरिकांनी न्याय मागायचा तरी कुठे, असा प्रश्न उपस्थित होत असून, या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

No comments: