Header Ads

अमरावतीत भाजपला दुहेरी धक्का.

 अमरावतीत भाजपला दुहेरी धक्का.

मनपा निवडणुकीत मुख्यमंत्री फडणवीस यांचे मामेभाऊ आणि आमदार भारतीय यांचे बंधू पराभूत

काँग्रेस व युवा स्वाभिमान पक्षाचा दणदणीत विजय

अमरावती | प्रतिनिधी – पी. एन. देशमुख (जि. प्र.)

अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतमोजणीत सुरुवातीच्या फेरीपासूनच राजकीय वातावरण तापले असून भाजपला मोठा धक्का बसला आहे. पहिल्याच फेरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोते आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचे बंधू तुषार भारतीय यांचा पराभव झाल्याने शहराच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

८७ जागांच्या अमरावती महापालिकेत निकाल येऊ लागल्यापासूनच सत्ता समीकरणाचे संकेत स्पष्ट होत आहेत. विशेषतः प्रभाग क्रमांक १४ मधील निकाल भाजपासाठी अत्यंत धक्कादायक ठरले. या प्रभागात काँग्रेसने क्लीन स्वीप साधत चारही जागांवर विजय मिळवला आहे. याच प्रभागातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोते यांचा पराभव झाला.

काँग्रेसच्या या दणदणीत विजयामुळे मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. फटाके, घोषणाबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात काँग्रेस समर्थकांनी विजयाचे जोरदार सेलिब्रेशन केले. हा निकाल अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेत्यांकडून देण्यात आली असून, सुरुवातीच्या फेरीतच सत्ता स्थापनेचे संकेत दिसू लागल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

प्रभाग क्रमांक १४अ मधील निकाल पुढीलप्रमाणे –

विलास इंगोले (काँग्रेस) यांनी भाजपचे अविनाश देऊळकर यांचा १२,२१७ विरुद्ध ४,९३४ मतांनी पराभव केला.

सुनीता भेले (काँग्रेस) यांनी संगीता बुरंगे यांचा ७,३९७ विरुद्ध ३,७७० मतांनी पराभव केला.

सुशीला रतावा (काँग्रेस) यांनी गंगा खारकर यांचा ८,६२५ विरुद्ध ५,९५६ मतांनी पराभव करत विजय मिळवला.

संजय शिरभाते (काँग्रेस) यांनी भाजपचे विवेक कलोते यांचा ५,६४५ विरुद्ध ४,७२६ मतांनी पराभव केला.

याचबरोबर साईनगर प्रभागातील निकालांनीही भाजपच्या अडचणी वाढवल्या आहेत. या प्रभागात भाजपचे उमेदवार आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचे बंधू तुषार भारतीय यांचा पराभव झाला आहे. आमदार रवी राणा यांचे निकटवर्तीय आणि युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार सचिन भेंडे यांनी विजय मिळवत बाजी मारली. ही निवडणूक आमदार रवी राणा यांनी प्रतिष्ठेची बनवली होती, त्यामुळे या निकालाला स्थानिक राजकारणात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

बहुरंगी राजकीय लढत

या निवडणुकीत अमरावतीत बहुरंगी राजकीय लढत पाहायला मिळाली. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदे गटाची शिवसेना, बसपा आणि युवा स्वाभिमान पार्टी यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. तर वंचित बहुजन आघाडी आणि युनायटेड फोरम यांनी आघाडी करून रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला होता. काही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस (चंद्र पवार गट) आणि समाजवादी पक्षाने आघाडी केली होती. काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात काही प्रभागांमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली.

सत्ता स्थापनेची उत्सुकता

अमरावती महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी ४४ जागांची आवश्यकता आहे. कोणता पक्ष किंवा आघाडी हा आकडा गाठणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. निवडणूक निकालानंतर आता महापौर आणि उपमहापौर पदासाठी राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

No comments:

Powered by Blogger.