Header Ads

रवीश पाटील कौलवकर यांचे भव्य शक्तिप्रदर्शन; प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत कसबा तारळे जिल्हा परिषदेसाठी अर्ज दाखल.

 रवीश पाटील कौलवकर यांचे भव्य शक्तिप्रदर्शन; प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत कसबा तारळे जिल्हा परिषदेसाठी अर्ज दाखल.

----------------------------------

राधानगरी प्रतिनिधी 

विजय बकरे 

----------------------------------

राधानगरी तालुक्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापू लागले आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, कसबा तारळे मतदारसंघातून राधानगरी पंचायत समितीचे माजी उपसभापती रवीश पाटील (कौलवकर) यांच्या सुविध पत्नी ऋतुजा रवीश पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज अत्यंत उत्साहात आणि ऐतिहासिक रॅलीद्वारे दाखल केला. या रॅलीला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहता, तालुक्यात कौलवकरांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत विरोधकांसमोर तगडे आव्हान उभे केले आहे.

ढोल-ताशांच्या गजरात रॅलीचा थरार

आज सकाळी कौलव येथून या भव्य रॅलीला सुरुवात झाली. फुलांनी सजवलेली गाडी आणि ढोल-ताशांच्या कडकडाटात निघालेल्या या रॅलीने संपूर्ण परिसराचे लक्ष वेधून घेतले. 'रवीश पाटील कौलवकर आगे बढो', 'आमचा नेता कसा असावा, रवीश पाटील यांच्यासारखा असावा' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. विशेषतः तरुण आणि महिला वर्गाचा या रॅलीतील सहभाग लक्षणीय होता. मार्गावर ठिकठिकाणी ग्रामस्थांनी त्यांचे औक्षण करून आणि पुष्पहार घालून जंगी स्वागत केले.

भाजपकडून उमेदवारी निश्चित; राजकीय गणिते बदलणार?

रवीश पाटील कौलवकर यांना भारतीय जनता पक्षाकडून (भाजप) उमेदवारी मिळणार असल्याचे दाट संकेत आहेत. आजच्या या जनसमुदायामुळे त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा त्यांना असलेला पाठिंबा पाहता, कसबा तारळे मतदारसंघात भाजपचे पारडे जड झाल्याचे चित्र दिसत आहे. या शक्तिप्रदर्शनामुळे विरोधकांच्या गोटात मात्र मोठी खळबळ उडाली आहे.

विकासाचा 'कौलवकर' वारसा

रवीश पाटील यांना 'भोगावती' साखर कारखान्याचे संस्थापक दादासाहेब पाटील कौलवकर आणि बाळासाहेब पाटील कौलवकर या महान नेतृत्वाचा वारसा लाभला आहे. ज्या घराण्याने भोगावती परिसरातील शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणली, त्याच घराण्याचा वारसा रवीश पाटील समर्थपणे पुढे नेत आहेत. सहकारी संस्थांचे जाळे विणून वाडी-वस्तीवर विकासाची गंगोत्री पोहोचवण्याचे काम या घराण्याने केले असून, तोच विश्वास आज जनतेच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत होता.

जनतेच्या आशीर्वादाने विकासाचा नवा संकल्प

अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रवीश पाटील म्हणाले की:

"पंचायत समितीच्या माध्यमातून मी केलेली विकासकामे जनतेने अनुभवली आहेत. आता जिल्हा परिषदेच्या मोठ्या व्यासपीठावरून मतदारसंघातील रस्ते, दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य सुविधांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध आहे. आजचा हा जनसागर म्हणजे केवळ गर्दी नसून, माझ्यावर आणि कौलवकर घराण्यावर जनतेने टाकलेला विश्वास आहे. हाच प्रतिसाद माझ्या विजयाची नांदी ठरेल."

या रॅलीमुळे कसबा तारळे मतदारसंघातील निवडणूक आता अधिक रंगतदार वळणावर आली आहे. रवीश पाटील यांच्या या झंझावातामुळे आगामी काळात तालुक्यातील राजकीय समीकरणे कशी बदलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Powered by Blogger.