पक्षांतर्गत गळती रोखण्यात अपयश; फुशारक्या आणि भ्रमनिर्मितीचा राजकीय खेळ.
पक्षांतर्गत गळती रोखण्यात अपयश; फुशारक्या आणि भ्रमनिर्मितीचा राजकीय खेळ.
-----------------------------
जयसिंगपूर प्रतिनिधी
-----------------------------
गळती थांबवता न आल्याने फुशारक्यांचा आधार; अस्तित्वाच्या कड्यावर उभे पक्ष.
आपल्या पक्षातील नेते आणि कार्यकर्ते सातत्याने दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असताना, ही गळती थांबवण्यात अपयश आल्याने पक्षात मोठे भगदाड पडले आहे. मात्र हे भगदाड बुजवण्याऐवजी, एका पक्षाचे अध्यक्ष पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका राष्ट्रीय पक्षाचे नेते व कार्यकर्ते आपल्या पक्षाच्या बॅनरखाली लढवतील, असे दावे करत आहेत. वस्तुस्थितीशी फारकत घेणारी ही वक्तव्ये राजकीय वास्तवापेक्षा हास्यास्पदच अधिक वाटतात.
दरम्यान, तालुक्यातील एका वजनदार नेत्याने चळवळीतील आक्रमक ओळख असलेल्या पक्षांतील नेते व कार्यकर्त्यांना फोडून आपल्या पक्षात घेण्याचा सपाटा लावला आहे. यात राष्ट्रीय पक्षांचे कार्यकर्तेही सामील आहेत. या पार्श्वभूमीवर त्या नेत्याला विरोध करण्यासाठी काही समविचारी पक्षांनी पत्रकार परिषद घेत, राष्ट्रीय पक्षांचे कार्यकर्ते आपल्या बॅनरखाली निवडणूक लढवतील, अशा फुशारक्या मारून स्वतःचीच पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
अलीकडील नगरपालिका निवडणुकांत स्वतःचे उमेदवार निवडून आणण्याची ताकद या चळवळीच्या नेत्यांकडे उरलेली नाही. उमेदवार देण्यासाठी कार्यकर्त्यांचीही टंचाई असताना, दुसऱ्या पक्षातील कार्यकर्ते आपल्याकडून लढतील अशी अपेक्षा ठेवणे हे राजकीय भ्रमाचेच द्योतक आहे. त्यामुळेच अशा वक्तव्यांवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
कालपर्यंत जे पक्ष परस्परांविरोधात निवडणुका लढवत होते, आंदोलने करत होते, चळवळी उभ्या करत होते—आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून इतरांना शहाणपण शिकवण्याचा प्रयत्न करणे हे मूर्खपणाचेच असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. आपले अस्तित्व संपत चालल्यानेच इतर पक्ष आपल्याकडे येतील, अशा भाबड्या व खोट्या आशा निर्माण केल्या जात आहेत. वास्तव स्वीकारून आत्मचिंतन करण्याची गरज या पक्षांसमोर उभी आहे.

No comments: