Header Ads

मिरचीचे दर गगनाला भिडले! कोल्हापूर जिल्ह्यात साठवणुकीच्या मसाल्याचे बजेट कोलमडले.

 मिरचीचे दर गगनाला भिडले! कोल्हापूर जिल्ह्यात साठवणुकीच्या मसाल्याचे बजेट कोलमडले.

-------------------------

 प्रतिनिधी - एस.एन.शेख 

------------------------


कोल्हापूर : कोल्हापूर शहर आणि  ग्रामीण भागात वर्षभरासाठी लागणारी चटणी आणि मसाला तयार करण्याची लगबग घराघरांत पाहायला मिळते. मात्र, यंदा या परंपरेला वाढत्या महागाईचा मोठा ठसका बसला आहे. कोल्हापुरी तांबडा रस्सा आणि झणझणीत जेवणासाठी प्रसिद्ध असलेल्या या भागात मिरचीचे दर प्रचंड वाढल्याने सामान्य नागरिकांच्या स्वयंपाकघराचे गणित पूर्णपणे बिघडले असून गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

 दरवर्षी उन्हाळ्यात कोल्हापूरसह कागलच्या बाजारपेठेत मिरची खरेदीसाठी मोठी गर्दी होते. लग्नसराई आणि पावसाळ्यापूर्वीची साठवणूक म्हणून लोक मोठ्या प्रमाणात मिरची खरेदी करतात. परंतु यंदा बाजारात मिरचीचे भाव २०० रुपयांपासून थेट १२०० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत. मिरचीचा हा तिखटपणा आता थेट ग्राहकांच्या खिशाला झोंबू लागला आहे. हवामानातील अनिश्चितता, पावसाचे कमी-जास्त प्रमाण आणि पिकांवर पडलेल्या रोगांमुळे यंदा मिरचीचे उत्पादन घटले आहे. त्यातच वाहतूक खर्च आणि काही प्रमाणात सुरू असलेल्या साठेबाजीमुळे दर अधिकच कडाडले आहेत.

कागलच्या बाजारपेठेत मिरचीची पारख करताना ग्राहक आणि शेतकरी दोघेही सध्या संभ्रमात असल्याचे चित्र आहे. एकीकडे उत्पादन कमी झाल्याने शेतकऱ्याला योग्य भाव मिळणे गरजेचे आहे, तर दुसरीकडे आवाक्याबाहेर गेलेल्या दरामुळे सामान्य ग्राहक हवालदिल झाला आहे. दर गगनाला भिडले असूनही परंपरेनुसार वर्षभराची चटणी करून ठेवण्यासाठी लोक बाजारात गर्दी करत आहेत, मात्र महागाईमुळे खरेदीच्या प्रमाणावर मर्यादा आली आहे. आधीच महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्या समोर आता पावसाळ्यातील वाढीव खर्च आणि महागलेली मिरची यामुळे घरखर्चाचा ताळमेळ बसवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

No comments:

Powered by Blogger.