चांदूरबाजारमध्ये पॅथॉलॉजी लॅबचा गोरखधंदा उघड; चुकीच्या अहवालांमुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ. एकाच रुग्णाच्या रक्त तपासणीत वेगवेगळे अहवाल; जिल्हा आरोग्य विभागाकडे तक्रार
चांदूरबाजारमध्ये पॅथॉलॉजी लॅबचा गोरखधंदा उघड; चुकीच्या अहवालांमुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ.
एकाच रुग्णाच्या रक्त तपासणीत वेगवेगळे अहवाल; जिल्हा आरोग्य विभागाकडे तक्रार
-----------------------
चांदूरबाजार प्रतिनिधी –
मयूर खापरे .
--------------------------
चांदूरबाजार शहरात काही पॅथॉलॉजी लॅबमध्ये सुरू असलेल्या कथित गैरप्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. चुकीच्या आणि विसंगत तपासणी अहवालांमुळे रुग्णांची दिशाभूल होत असून आर्थिक फसवणुकीचे प्रकार घडत असल्याची तक्रार जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य विभाग, अमरावती यांच्याकडे करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, शहरातील “श्री दत्त लॅब” आणि “मेडिक लॅब” या नावाने सुरू असलेल्या पॅथॉलॉजी केंद्रांमध्ये योग्य पात्रता व तांत्रिक निकषांचे पालन न करता तपासण्या केल्या जात असल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे. तपासणी अहवालांमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून येत असून त्यामुळे रुग्ण चुकीच्या निदानावर उपचार घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यासंदर्भात तक्रारदार रोहित देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २३ मार्च २०२६ रोजी त्यांच्या पत्नीची रक्त तपासणी “श्री दत्त लॅब” येथे केली असता हिमोग्लोबिन ७.०० ग्रॅम इतके कमी दाखविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी शंका व्यक्त केल्यानंतर दि. २७ मार्च रोजी “मेडिक लॅब” येथे तपासणी केली असता १२.४ ग्रॅम इतका अहवाल आला.
या दोन अहवालांमध्ये मोठी तफावत असल्याने पुढील खात्रीसाठी “मुनोत लॅब” येथे तपासणी केली असता ९.९ ग्रॅम आणि अमरावती येथील “स्पंदन लॅब”मध्ये ९.८ ग्रॅम असा अहवाल प्राप्त झाला. डॉक्टरांनी यातील शेवटचे दोन अहवाल योग्य असल्याचे सांगितले.
या संपूर्ण प्रकारामुळे संबंधित लॅबच्या अहवालांबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. विशेष म्हणजे तक्रारदाराच्या पत्नीला सहा महिन्यांचे बाळ असून अशा चुकीच्या अहवालांवर आधारित उपचार दिले गेले असते तर तिच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकला असता, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
तसेच, संबंधित लॅबकडे शासनमान्यता, आवश्यक परवाने व प्रशिक्षित तज्ज्ञ उपलब्ध आहेत की नाहीत, याबाबतही शंका उपस्थित करण्यात आली आहे. हा प्रकार केवळ एका रुग्णापुरता मर्यादित नसून अनेक नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असल्याने अत्यंत गंभीर मानला जात आहे.
दरम्यान, तक्रारदाराने जिल्हा आरोग्य विभागाकडे सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारे नागरिकांची फसवणूक होऊ नये यासाठी कठोर उपाययोजना करण्याचीही विनंती करण्यात आली आहे.
निष्कर्ष :
चांदूरबाजारमधील पॅथॉलॉजी लॅबमधील कथित गैरप्रकारामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.

No comments: