Header Ads

घुणकीत बिबट्याच्या हल्ल्यात शिंगरू ठार; मेंढपाळांचे ३० हजारांचे नुकसान.

 घुणकीत बिबट्याच्या हल्ल्यात शिंगरू ठार; मेंढपाळांचे ३० हजारांचे नुकसान.

भर वस्तीत बिबट्याची दहशत कायम; वनविभागाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह.

हातकणंगले तालुक्यातील घुणकी येथे बिबट्याच्या हल्ल्यात घोड्याचे पिल्लू (शिंगरू) ठार झाल्याची घटना शनिवारी (दि. ४ एप्रिल) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. या घटनेमुळे मेंढपाळ रवींद्र रंगराव सिद यांचे सुमारे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घुणकी येथील रवींद्र सिद, काशिनाथ नांगरे, नितीन गावडे व कृष्णा डांगे या मेंढपाळांचा सुमारे ४०० मेंढरांचा कळप भिकाजी तुकाराम सिद यांच्या गट क्रमांक ४४६ या शेतात खतासाठी बसविण्यात आला होता. हे शेत नागरी वस्तीलगत असल्याने परिसरात वर्दळ असतानाही बिबट्याने धाडसाने हल्ला केला.

शनिवारी सायंकाळी रवींद्र सिद यांचा घोडा व त्याचे शिंगरू चरत असताना बिबट्याने मेंढरांच्या कळपाशेजारी असलेल्या शिंगरूवर झडप घातली. बिबट्याने शिंगरूचे मुंडके पकडले; मात्र मेंढपाळांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने शिंगरू सोडून उसाच्या शेतात धूम ठोकली. या हल्ल्यात शिंगरू जागीच ठार झाले.

घटनेची माहिती मिळताच यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी वनविभागाला कळविले. वनरक्षक श्रद्धा सोनटक्के यांनी रात्री घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर रविवारी (दि. ५ एप्रिल) वनपाल कुलदीप कांबळे, वनरक्षक श्रद्धा सोनटक्के व वनसेवक संतोष बिरांगळे यांनी पंचनामा केला. डॉ. वाळवेकर व डॉ. अंकुश तुराई यांनी मृत शिंगरूचे शवविच्छेदन केले.

दरम्यान, घुणकी परिसरात गेल्या एक वर्षापासून बिबट्याची दहशत असून अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. वनविभागाने सापळा लावला असला तरी बिबट्या अद्याप पकडण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

बिबट्या भर वस्तीत घुसून हल्ले करत असताना वनविभाग ठोस उपाययोजना करत नसल्याचा आरोप होत असून, मोठी दुर्घटना होण्यापूर्वीच बिबट्याला पकडून जंगलात सोडावे, तसेच नुकसानग्रस्तांना बाजारभावानुसार तात्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी संजय वाघमोडे यांनी केली आहे.

घटनास्थळी भिमराव गावडे, काशिनाथ सिद, बिरु सिद, बंडा सिद, सुखदेव सिद, राहुल सिद, सुभाष सिद, संजय सलगर, भिकाजी सिद, चंद्रकांत तेली, पोलीस पाटील यांच्यासह शेतकरी व मेंढपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.