Header Ads

शाहुवाडी येथे ‘शेती वाचवा, शेतकरी वाचवा परिषद’ आयोजन

 शाहुवाडी येथे ‘शेती वाचवा, शेतकरी वाचवा परिषद’ आयोजन

------------------------------------

मलकापूर प्रतिनिधी : रोहित पास्ते .

-------------------------------------

शाहुवाडी तालुक्यातील शेतकरी प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी “शेती वाचवा, शेतकरी वाचवा परिषद” आयोजित करण्यात आली आहे. येत्या रविवारी दि. १२ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२ वाजता ही परिषद संकल्प सिद्धी मंगल कार्यालय, शाहुवाडी येथे पार पडणार आहे.

या परिषदेस अध्यक्ष म्हणून खासदार व शेतकरी नेते राजाराम सिंह उपस्थित राहणार असून उद्घाटक म्हणून माजी खासदार व शेतकरी नेते राजू शेट्टी सहभागी होणार आहेत. तसेच या परिषदेस भाई भारत पाटील व अतुल दिघे (कामगार नेते) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

परिषदेत शेतकऱ्यांच्या विविध ज्वलंत प्रश्नांवर चर्चा करून पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे संरक्षण, जंगली जनावरांपासून पिकांचे रक्षण, जंगलतोड थांबवणे, औद्योगिक व केमिकल प्रकल्पांमुळे होणारे प्रदूषण रोखणे, तसेच आयात-निर्यात धोरणामुळे होणारे नुकसान थांबवणे या प्रमुख मागण्या मांडण्यात येणार आहेत. शेतमालाला उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट भाव मिळावा, ही देखील महत्त्वाची मागणी आहे.

सध्या वाढते उत्पादन खर्च, घटते बाजारभाव, दलालांचे वर्चस्व, जंगली प्राण्यांचा वाढता त्रास आणि विविध प्रकल्पांमुळे शेतीचे नुकसान होत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. शासनाच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचे हित दुर्लक्षित होत असल्याचा आरोपही पत्रकातून करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने शेतकरी व नागरिकांनी परिषदेस उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

No comments:

Powered by Blogger.