मॉर्निंग वॉकला गेलेल्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील १.६० लाखांची सोन्याची चेन हिसकावली..
------------------------
शशिकांत कुंभार.
________________
शहरातील रुईकर कॉलनी परिसरात मॉर्निंग वॉकला गेलेल्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील तब्बल १ लाख ६० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन दुचाकीस्वार दोन अज्ञात चोरट्यांनी हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी घडली. या प्रकारामुळे शाहूपुरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 377/2026 अन्वये बीएनएस कलम 304, 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सुशिला मोहन रोहिडा (वय 62, रा. रुईकर कॉलनी, कोल्हापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या गुरुवारी सकाळी सुमारे 8.15 वाजण्याच्या सुमारास ग्लोमिंग बर्ड्स स्कूलजवळ मॉर्निंग वॉक करत होत्या.
यावेळी काळ्या रंगाच्या मोटारसायकलवर आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांचा पाठलाग केला. त्यातील जांभळ्या रंगाचा शर्ट घातलेल्या इसमाने अचानक त्यांच्या गळ्यातील अंदाजे 16 ते 17 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेली. त्यानंतर दोघेही संशयित निळा-पांढरा चौकडीचा शर्ट घातलेल्या साथीदारासह मोटारसायकलवरून रुक्मिणीनगरच्या दिशेने फरार झाले.
घटनेनंतर घाबरलेल्या फिर्यादी यांनी घरी जाऊन नातेवाईकांशी चर्चा केली व त्यानंतर दिरांसोबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. चोरीस गेलेल्या सोन्याच्या चेनची किंमत सुमारे १ लाख ६० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक डोईजड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.

No comments: