“डोंगररांगांमध्ये फुलणार ‘पांढरे सोने’; शेतकऱ्यांसाठी मोफत काजू कलमांची सुवर्णसंधी”
“डोंगररांगांमध्ये फुलणार ‘पांढरे सोने’; शेतकऱ्यांसाठी मोफत काजू कलमांची सुवर्णसंधी”
----------------------------------------राधानगरी, प्रतिनिधी विजय बकरे :
-----------------------------------------
पश्चिम महाराष्ट्रातील डोंगराळ भागात काजू लागवड आता केवळ पर्यायी शेती न राहता शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचा मजबूत आधार बनत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालय, कोल्हापूर व आत्मा प्रकल्पाच्या माध्यमातून प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत सन २०२६-२७ साठी ‘मागेल त्याला काजू कलमे’ ही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत १० मे ते १९ मे दरम्यान महाडीबीटी पोर्टलवर अर्ज प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र शेतकऱ्यांना मोफत उच्च उत्पादनक्षम काजू कलमे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. विशेष म्हणजे या योजनेत कलमे मोफत दिली जाणार असली तरी इतर कोणत्याही प्रकारचे अनुदान मिळणार नसल्याचे कृषि विभागाने स्पष्ट केले आहे.
राधानगरी, भुदरगड, आजरा, गडहिंग्लज आणि चंदगड या डोंगराळ तालुक्यांतील हवामान व जमीन काजू लागवडीस अत्यंत पोषक मानली जाते. कमी पाण्यात, उताराच्या जमिनीत आणि कमी खर्चात येणारे हे पीक आज शेतकऱ्यांसाठी ‘पांढरे सोने’ ठरत आहे.
काजू प्रक्रिया उद्योग, प्रतवारी, पॅकेजिंग आणि विक्री साखळीमुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होत असून महिलांसाठीही स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. त्यामुळे या योजनेकडे शेतकऱ्यांसह महिला बचतगट आणि तरुणांचा विशेष कल वाढताना दिसत आहे.
योजनेअंतर्गत प्रति शेतकरी किमान १० ते कमाल ५० मोफत काजू कलमे देण्यात येणार असून ०.०५ हेक्टर ते ०.२५ हेक्टर क्षेत्र मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. अर्जासाठी ७/१२ उतारा, ८-अ उतारा, आधारकार्ड आणि फार्मर आयडी आवश्यक असणार आहे.
महिला बचतगट, युवक आणि शेतकऱ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव यांनी केले आहे.

No comments: