Header Ads

वयाच्या ८६ व्या वर्षीही तरुणाईला लाजवणारा उत्साह; कौलवचे कुंडलिक पाटील सायकल चालवून राहतात निरोगी.

 वयाच्या ८६ व्या वर्षीही तरुणाईला लाजवणारा उत्साह; कौलवचे कुंडलिक पाटील सायकल चालवून राहतात निरोगी.

--------------------------------------
राधानगरी प्रतिनिधी : विजय बकरे.
---------------------------------------

आजच्या धकाधकीच्या आणि बदलत्या जीवनशैलीत निरोगी राहणे हे मोठे आव्हान बनले आहे. मोबाईल, दुचाकी आणि बैठ्या जीवनशैलीच्या युगात अनेकांना कमी वयातच विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत राधानगरी तालुक्यातील कौलव येथील ८६ वर्षीय कुंडलिक धोंडी पाटील यांनी आपल्या कष्टाळू जीवनशैलीने आणि नियमित सायकलिंगच्या सवयीने तरुणांसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

भोगावती साखर कारखान्याचे माजी कर्मचारी असलेले कुंडलिक पाटील यांनी तब्बल ३० वर्षे कारखान्यात कामगार म्हणून सेवा बजावली. नोकरीच्या काळात ते दररोज घरापासून कारखान्यापर्यंतचा सुमारे सहा किलोमीटरचा प्रवास सायकलवरून करत असत. विशेष म्हणजे निवृत्तीला २६ वर्षे उलटून गेली असली तरी त्यांच्या जीवनातील सायकलचे महत्त्व आजही तसूभरही कमी झालेले नाही.

आज वयाच्या ८६ व्या वर्षीही ते शेतीची कामे, जनावरांसाठी वैरण आणणे, गावातील दैनंदिन कामे यासाठी सायकलचाच वापर करतात. त्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह, शरीरातील चपळता आणि काम करण्याची ऊर्जा पाहून अनेक तरुणांनाही आश्चर्याचा धक्का बसतो.

"सायकलिंग हेच माझ्या दीर्घायुष्याचे आणि उत्तम आरोग्याचे रहस्य आहे. नियमित सायकल चालवल्यामुळे शरीर तंदुरुस्त राहते आणि मनही प्रसन्न राहते."

— कुंडलिक धोंडी पाटील

आज अनेक तरुण अगदी छोट्या अंतरासाठीही दुचाकीचा वापर करताना दिसतात. मात्र कुंडलिक पाटील यांनी आयुष्यभर सायकलला दिलेले प्राधान्य आणि आजही कायम ठेवलेली ही सवय आरोग्यदायी जीवनाचा खरा संदेश देणारी आहे.

कष्ट, शिस्त आणि नियमित व्यायाम यांच्या बळावर वयाच्या ८६ व्या वर्षीही जोमाने सायकल चालवणारे कुंडलिक पाटील हे केवळ कौलव गावाचेच नव्हे, तर संपूर्ण तरुण पिढीसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.

No comments:

Powered by Blogger.