चंद्रे पाटीवर मृत्यूचा वेगवान कहर! दुचाकीच्या भीषण धडकेत ज्येष्ठाचा दुर्दैवी अंत; गावावर शोककळा.
कोल्हापूर–गारगोटी मार्गावरील चंद्रे पाटी (ता. राधानगरी) येथे झालेल्या भीषण अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दुचाकीवरील दोन युवक जखमी झाले आहेत. कृष्णात पांडुरंग पाटील (वय ६२, रा. चंद्रे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णात पाटील हे कामानिमित्त रस्त्याने पायी जात असताना कोल्हापूरहून गारगोटीच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की त्यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर रस्त्यावर रक्ताचा सडा पडल्याने घटनास्थळी एकच खळबळ उडाली.
घटना पाहताच परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी कृष्णात पाटील यांना खासगी वाहनातून कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
कृष्णात पाटील हे शांत, मनमिळावू आणि सर्वांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे व्यक्तिमत्त्व म्हणून गावात परिचित होते. त्यांच्या अकाली निधनामुळे चंद्रे गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगी, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.
अचानक घडलेल्या या दुर्दैवी अपघातामुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून चंद्रे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वारांवर उपचार सुरू असून पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून केला जात आहे

No comments: