Header Ads

नदीकाठच्या शेतकऱ्यांना झटका; पाणी उपसा केल्यास यंत्र जप्तीचा इशारा

 नदीकाठच्या शेतकऱ्यांना झटका; पाणी उपसा केल्यास यंत्र जप्तीचा इशारा.....

-----------------------------
राधानगरी 
विजय बकरे.
---------------------------


कोल्हापूर, दि. १५ जून : संभाव्य पाणीटंचाई आणि पिण्याच्या पाण्याचा उपलब्ध साठा सुरक्षित ठेवण्यासाठी कोल्हापूर पाटबंधारे विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून पंचगंगा, भोगावती, दूधगंगा, वारणा, तुळशी, कासारी, कडवी, कुंभी, धामणी आणि जांभळी नद्यांच्या दोन्ही तीरांवरील शेतीसाठी होणाऱ्या पाणी उपशावर आज (दि. १५ जून) पासून पुढील आदेशापर्यंत बंदी लागू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर पाटबंधारे विभाग (उत्तर) यांच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी उपसाबंदीचा आदेश जारी केला आहे. भारतीय हवामान विभागाने यंदा अल-निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता वर्तविल्याने पर्जन्यमानात घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा प्राधान्याने पिण्यासाठी राखून ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

उपसाबंदी कालावधीत कोणत्याही व्यक्तीने किंवा संस्थेने अनधिकृतपणे पाणी उपसा केल्याचे आढळून आल्यास संबंधित उपसा यंत्र तात्काळ जप्त करण्यात येणार आहे. तसेच संबंधित परवानाधारकाचा उपसा परवाना एक वर्षासाठी रद्द करण्यात येईल, असा कठोर इशारा आदेशात देण्यात आला आहे. यासोबतच अशा कारवाईमुळे होणाऱ्या नुकसानीस पाटबंधारे विभाग जबाबदार राहणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ मधील कलम ५१(३) व ९७ अन्वये हा आदेश जारी करण्यात आला असून त्याच्या अंमलबजावणीसाठी संबंधित तहसीलदार, महावितरणचे अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, नदीकाठच्या भागातील उपसा सिंचन योजनांवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांमध्ये या निर्णयामुळे चिंता व्यक्त होत असून, पावसाच्या परिस्थितीनुसार पुढील काळात प्रशासनाकडून आढावा घेऊन निर्णय घेतला जाणार आहे.

No comments:

Powered by Blogger.