Header Ads

मरळी ता. पन्हाळा येथील दिंडी विठू नामाच्या गजरात पुण्याकडे रवाना ; वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह.

मरळी ता. पन्हाळा येथील दिंडी विठू नामाच्या गजरात पुण्याकडे रवाना ; वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
कुडित्रे प्रतिनिधी- प्रा. पी जे पाटील.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
 कोल्हापूर जिल्ह्यातून आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पन्हाळा तालुक्यातील मरळी येथील मानाची दिंडी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी भक्तीमय वातावरणात पुण्याच्या दिशेने रवाना झाली. 

'ज्ञानोबा-तुकाराम ' आणि पुंडलीक वरदे हरी विठ्ठल ' च्या जयघोषात टाळ मृदंगाच्या तालावर संपूर्ण मरळी गाव विठ्ठलमय झाले होते. यावेळी गावकऱ्यांकडून भावपूर्ण वातावरणात वारकऱ्यांना निरोप दिला.

दिंडी प्रस्थानापूर्वी मरळी गावामध्ये विठ्ठल- रुक्मिणी आणि माऊलींच्या पादुकांचे विशेष पूजन करण्यात आले. याप्रसंगी गावातील माऊली भजनीमंडळाचे पकवाज वादक ह.भ.प. संभाजी गणपती दांगट प्रमुख उपस्थितीत होते. तसेच चोपदार, विणेकरी,मृदंगमनी, ज्ञानेश्वरी व तुळशीवृंदावन शिरावर घेण्याचा मान मिळवलेल्या वारकऱ्यांना सुहासिनींनी  ओवाळून सुखकर प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. मरळी आणि परिसरातील शेकडो वारकरी या दिंडीमध्ये पारंपरिक पोशाखात हाती भगव्या पताका, टाळ- मृदंग आणि डोक्यावर तुळशीवृंदावन घेऊन उत्साहाने सहभागी झाले होते.

कोल्हापूर जिल्ह्यातून निघालेली ही दिंडी विविध गावे पार करत पुण्यामध्ये माऊलींच्या पालखीत सामील होणार आहे. पुण्यातील भवानी पेठेतील श्री विठेबा मंदिर आणि अलंकापूरीत (आळंदी) विसावणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मुख्य पालखी सोहळ्यात मानाची दिंडी रथाच्या पुढे सातव्या क्रमांकात सामील होऊन पुढे पंढरपूरकडे मार्गक्रमण करेल. 

१९९२ साली या दिंडीची स्थापना झाली असून या दिंडीचे संस्थापक स्व. यशवंत गोपाळा पाटील, स्व. शिवा धोंडी पाटील हे आहेत तसेच दत्तात्रय शंकर पाटील, शिवाजी रोहिले हे दिंडी चालक आहेत. तसेच दरवर्षी ट्रॅक्टरची मोफत सेवा दिगंबर पाटील यांच्याकडून मिळत आहे . वारकऱ्यांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था दिंडी प्रमुख ह.भ.प. प्रकाश आबा पाटील, कृष्णात पाटील, राजाराम पाटील, शामराव पाटील, विठ्ठल पाटील, वसंत पाटील, सदाशिव पाटील, नितिन पाटील यांचे मार्फत दिंडीमार्गावर ठिकठिकाणी करण्यात आली आहे. पुणे ते पंढरपूर या दिंडीमार्गावर गावातील व परिसरातील शेकडो वारकरी व भाविक भक्त दररोज मोठ्या संख्येने ज्ञानेश्वर माऊलींच्या रथाच्या व पालखीच्या भेटीसाठी जातात.

No comments:

Powered by Blogger.