Header Ads

नाकाचा चावा घेऊन भटक्या कुत्र्याचा थरारक हल्ला! राधानगरीतील स्वॉ मिल मालक गंभीर जखमी; चांदेकरवाडीत भीतीचे वातावरण

नाकाचा चावा घेऊन भटक्या कुत्र्याचा थरारक हल्ला! राधानगरीतील स्वॉ मिल मालक गंभीर जखमी; चांदेकरवाडीत भीतीचे वातावरण.

राधानगरी :- राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाडी येथे भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात स्वॉ मिल मालक गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्वामी स्वॉ मिलचे मालक अनिल यशवंत सुतार (वय ६०) हे स्वॉ मिलच्या पडवीत झोपले असताना एका भटक्या कुत्र्याने त्यांच्या चेहऱ्यावर अचानक झडप घालत नाकाचा पुढील भाग चावून गंभीर जखमी केले. या भीषण हल्ल्यानंतर त्यांना तातडीने कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चांदेकरवाडी येथे अनिल सुतार यांची स्वामी स्वॉ मिल असून ते लाकूड कटिंगचा व्यवसाय करतात. नेहमीप्रमाणे ते स्वॉ मिलच्या बाहेरील पडवीत झोपले होते. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे परिसरातील अनेक भटकी कुत्री आसरा शोधत स्वॉ मिलच्या आडोशाला येत आहेत. त्यापैकी एक कुत्रा त्यांच्या अंथरुणाजवळ येऊन झोपला होता.

झोपेतून जागे झाल्यानंतर सुतार यांनी त्या कुत्र्याला हाकलण्याचा प्रयत्न केला. मात्र, अचानक आक्रमक झालेल्या कुत्र्याने त्यांच्या चेहऱ्यावर झेप घेत नाकाचा पुढील भाग चावून फाडला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. रात्रीच्या वेळी ते एकटे असल्याने त्यांना स्वतःचा बचाव करता आला नाही. त्यांच्या आरडाओरडीनंतर नातेवाईक व परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. रक्तबंबाळ अवस्थेतील सुतार यांना तातडीने कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले.

या घटनेमुळे चांदेकरवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विशेषतः पावसाळ्यात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. ग्रामपंचायत व संबंधित प्रशासनाने तातडीने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

No comments:

Powered by Blogger.