विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात.
विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात.
---------------------------
इंदापूर प्रतिनिधी
गणेश धनवडे
---------------------------
स्वातंत्र्याचा वारसा जपत राष्ट्रनिर्माणासाठी योगदान देण्याचे सचिव वीरसिंह रणसिंग यांचे आवाहन.
कळंब-वालचंदनगर : इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानच्या विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात, देशभक्तीपूर्ण वातावरणात व विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यदिनानिमित्त सकाळपासूनच महाविद्यालय परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव वीरसिंह रणसिंग यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत उपस्थितांनी राष्ट्रगीत गायले. यावेळी संपूर्ण परिसर देशभक्तीच्या भावनेने भारावून गेला.
राष्ट्रनिर्माणात योगदान द्या : वीरसिंह रणसिंग
अध्यक्षीय मनोगतात सचिव वीरसिंह रणसिंग यांनी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्यागाची आठवण करून दिली. विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याचे महत्त्व समजून घेत शिस्त, प्रामाणिकपणा, सामाजिक बांधिलकी आणि संविधानिक मूल्ये आत्मसात करावीत. शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या व देशाच्या विकासात योगदान देऊन जबाबदार नागरिक बनावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुहास भैरट यांनी केले. त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान, त्याग व बलिदान यांची माहिती देत देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे, असे सांगितले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक काळंगे यांनी शुभेच्छा संदेश देताना स्वातंत्र्याचा खरा अर्थ केवळ परकीय सत्तेपासून मुक्तता नसून सामाजिक, शैक्षणिक व वैचारिक प्रगती साधणे हा असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त सहभाग
स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातील ५० स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. राजेंद्रकुमार डांगे, प्रा. तेजश्री हुंबे तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागातील सर्व समिती सदस्य उपस्थित होते. स्वयंसेवकांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष उत्साह प्राप्त झाला. राष्ट्रसेवा, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत राष्ट्रीय सेवा योजना विभागाने स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अभिजीत शिंगाडे यांनी केले. यावेळी उपप्राचार्य प्रा. ज्ञानेश्वर गुळीग, डॉ. प्रशांत शिंदे, सर्व शाखाप्रमुख, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘जय हिंद’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणांनी महाविद्यालय परिसर दुमदुमून गेला. उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात स्वातंत्र्यदिन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ झाली.

No comments: