उचगाव हद्दीत वीज वितरण कंपनीचा हलगर्जीपणा? मेंढपाळाच्या तीन मेंढरांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू.
उचगाव हद्दीत वीज वितरण कंपनीचा हलगर्जीपणा? मेंढपाळाच्या तीन मेंढरांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू.
---------------------------
गांधीनगर : प्रतिनिधी
---------------------------
उचगाव हद्दीतील खत कारखान्याच्या मागील विकास कॉलनी परिसरात वीज वितरण कंपनीच्या कथित हलगर्जीपणामुळे तीन मेंढरांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गडमुडशिंगी, ता. करवीर येथील मेंढपाळ जयराम धुळाप्पा पुजारी यांच्या मेंढ्यांवर ही दुर्घटना ओढवली असून, या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
मेंढरे चारण्यासाठी गेलेल्या पुजारी यांच्या कुटुंबातील आई आणि मुलीसमोरच कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा आधार असलेल्या मुक्या जनावरांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गरीब मेंढपाळासाठी प्रत्येक मेंढरू ही केवळ पशुधनाची संख्या नसून त्याच्या कुटुंबाच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा आधार असतो. त्यामुळे तीन मेंढरांचा मृत्यू म्हणजे पुजारी कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान आहे.
या दुर्घटनेला वीज वितरण कंपनीच्या विद्युत यंत्रणेतील संभाव्य त्रुटी किंवा देखभालीतील हलगर्जीपणा कारणीभूत आहे का, याची तातडीने चौकशी होणे गरजेचे आहे. संबंधित ठिकाणी विद्युत वाहिन्या, खांब व इतर यंत्रणेची सुरक्षितता तपासून दोष आढळल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
तसेच मृत मेंढ्यांची योग्य पंचनामा करून मेंढपाळ जयराम पुजारी यांना तातडीने शासकीय अथवा संबंधित विभागाकडून आर्थिक नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.
महावितरणने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने चौकशी करावी आणि भविष्यात अशा दुर्घटना होऊ नयेत यासाठी धोकादायक विद्युत यंत्रणेची पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

No comments: