Header Ads

मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असूनही विवाह लावल्याचा आरोप; आईसह नातेवाईक आणि सासरच्या मंडळींचाही सहभाग असल्याचे तक्रारीत नमूद

 मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असूनही विवाह लावल्याचा आरोप; आईसह नातेवाईक आणि सासरच्या मंडळींचाही सहभाग असल्याचे तक्रारीत नमूद.


कुपवाड | प्रतिनिधी

अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीतील कुपवाड परिसरात समोर आला आहे. याप्रकरणी मुलीचा पती, आईसह पतीचे वडील, भाऊ आणि अन्य नातेवाईक अशा एकूण सहा जणांविरुद्ध एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ फेब्रुवारी २०२६ ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत अहिल्यानगर, कुपवाड आणि मिरज परिसरात हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. पीडिता अल्पवयीन असल्याची माहिती असूनही तिचा विवाह लावून देण्यात आला. विवाहानंतर पतीने तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे.

विशेष म्हणजे, या बालविवाहाच्या प्रक्रियेत पीडितेची आई, नातेवाईक तसेच पतीचे वडील आणि भाऊ यांचाही सहभाग असल्याचे फिर्यादी जबाबात नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी २ नोव्हेंबर रोजी जिल्हा चाइल्ड हेल्पलाइन, सांगली यांच्यामार्फत पीडितेचा जबाब नोंदविण्यात आला. त्यानंतर प्राप्त जबाब व कागदपत्रांच्या आधारे ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.१९ वाजता एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

लागू कलमे : भारतीय न्याय संहिता कलम ६४(१), ३(५), पोक्सो कायदा २०१२ मधील कलम ४, ५(एल), ६ आणि बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ मधील कलम ९, ११ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

No comments:

Powered by Blogger.