कुपवाड एमआयडीसीत मटका-जुगाराचे जाळे फोफावले? ऑनलाइन कॅसिनोच्या नावाखालीही पैशांचा खेळ!
कुपवाड एमआयडीसीत मटका-जुगाराचे जाळे फोफावले? ऑनलाइन कॅसिनोच्या नावाखालीही पैशांचा खेळ!
चौकाचौकांत मटक्याचे आकडे घेतले जात असल्याची चर्चा; तरुणाई आणि कष्टकरी वर्ग जुगाराच्या विळख्यात अडकण्याची भीती, पोलीस प्रशासनाच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष!
कुपवाड | फ्रंटलाईन न्यूज नेटवर्क
कुपवाड शहरासह एमआयडीसी परिसरात अवैध मटका जुगार आणि ऑनलाइन कॅसिनोच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित जुगार व्यवहारांची चर्चा चांगलीच रंगू लागली आहे. शहरातील काही चौकांमध्ये उघडपणे मटक्याचे आकडे घेतले जात असल्याची चर्चा नागरिकांमधून होत असून, ऑनलाइन कॅसिनोच्या माध्यमातूनही आर्थिक उलाढाल सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे कुपवाडमध्ये अवैध जुगाराचे जाळे नेमके किती खोलवर पसरले आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
कमी पैशांत मोठ्या कमाईचे आमिष; तरुणाई जुगाराच्या विळख्यात?
सुरुवातीला थोडे पैसे लावून मोठी कमाई करण्याचे स्वप्न दाखवले जाते. मात्र, या आमिषाला बळी पडणाऱ्यांचे आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता आहे. विशेषतः तरुण वर्ग आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या कष्टकरी नागरिकांना अशा जुगाराचा फटका बसू शकतो. ऑनलाइन कॅसिनोच्या माध्यमातून मोबाईलवरच पैशांचा खेळ सुरू असल्याची चर्चा असल्याने या प्रकारावर नियंत्रण ठेवण्याचे आव्हानही वाढले आहे.
मटक्याचे आकडे घेणारे कोण? पडद्यामागचे सूत्रधार कोण?
कुपवाड एमआयडीसी परिसरात कथित मटका व्यवसाय चालवणारे नेमके कोण? या व्यवहारांना आर्थिक रसद पुरवणारे कोण? ऑनलाइन कॅसिनोच्या नावाखाली पैशांची देवाणघेवाण कोणत्या माध्यमातून केली जाते? या प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणे गरजेचे आहे. या व्यवसायामागे मोठे जाळे कार्यरत आहे का, याचाही शोध घेण्याची आवश्यकता आहे
पोलीस प्रशासनाच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष!
कुपवाड एमआयडीसी पोलीस प्रशासनाने या चर्चांची आणि नागरिकांकडून व्यक्त होत असलेल्या आरोपांची गांभीर्याने दखल घ्यावी. संवेदनशील ठिकाणी गोपनीय पद्धतीने तपासणी करून अवैध मटका जुगार सुरू असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. ऑनलाइन जुगाराच्या आर्थिक व्यवहारांचीही सखोल चौकशी व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
अवैध जुगाराला आळा बसणार की मटक्याचा आकड्यांचा खेळ असाच सुरू राहणार? कुपवाडकरांच्या या प्रश्नाचे उत्तर आता पोलीस प्रशासनाच्या ठोस कारवाईतूनच मिळणार आहे.

No comments: