कागल पश्चिम भागातील गावांतील खरीप पिके करपली अल्पभूधारक शेतकरी आर्थिक संकटात कागल तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी
कागल पश्चिम भागातील गावांतील खरीप पिके करपली
अल्पभूधारक शेतकरी आर्थिक संकटात कागल तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी.
मुरगूड/ जोतीराम कुंभार
यावर्षी पावसाने ओढ दिल्याने कागल तालुक्याच्या पश्चिम भागातील डोंगराळ परिसरातील खरीप हंगाम पूर्णपणे संकटात सापडला आहे. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या हजारो हेक्टर क्षेत्रातील भात, भुईमूग, सोयाबीन आणि नाचणी ही पिके करपून गेली आहेत. कष्टाने पिकविलेली शेती हातची गेल्याने अल्पभूधारक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे संपूर्ण कागल तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी मुरगूड येथील शेतकरी संघटनेने केली आहे.
चिमगाव, ठाणेवाडी, बोळावी, जख्खेवाडी, बोळावीवाडी, हळदी, बेनिग्रे, करंजिवने, बेलेवाडी, कासारी, हासूर सेनापती, कापशी, बाळेघोल, तमणाकवाडा, माद्याळ, हणबरवाडी, अर्जुनी, उंदरवाडी, सोनाळी, पिराचीवाडी, सावर्डे बुद्रुक, सावर्डे खुर्द, चौडाळ, साके, व्हनाळी, केनवडे, गोरंबे, मुरगूड, यमगे, हमीदवाडा, बामणी, शेंडूर, एकोंडी यांसह पश्चिम भागातील ७० ते ८० गावांतील शेतकऱ्यांना पावसाअभावी मोठा फटका बसला आहे. डोंगरउतारावरील आणि पावसावर अवलंबून असणाऱ्या जमिनींतील पिके जळून गेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
तालुक्यातील बारमाही सिंचनाखालील जमिनी आणि डोंगराळ भागातील कोरडवाहू शेती यांच्यात मोठी तफावत आहे. मोठ्या शेतकऱ्यांच्या तुलनेत गुंठा-दोन गुंठ्यांवर शेती करणारा अल्पभूधारक शेतकरी अधिक अडचणीत आहे. वाढती महागाई, दिवाळीचा खर्च, मुलांची शैक्षणिक फी आणि दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कामुळे शेतकरी कुटुंबांची आर्थिक कोंडी झाली आहे. मुलांची फी भरावी की घरखर्च भागवावा, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.
ग्रामीण बाजारपेठांमध्ये आर्थिक उलाढाल वाढते. मात्र यंदा पिकांचे नुकसान झाल्याने मुरगूड, गारगोटी, पूर, केनवडे आणि वाघापूर येथील बाजारपेठांमध्ये मंदीचे वातावरण आहे. शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.
चौकट-------
राधानगरी, भुदरगड, चंदगड, आजरा आणि गगनबावडा तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात आला असताना पावसाअभावी खरीप पिकांचे मोठे नुकसान झालेल्या कागल तालुक्याला वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. दुष्काळग्रस्त तालुका जाहीर करण्यापूर्वी प्रशासनाने प्रत्येक गावातील पर्जन्यमान आणि पीकस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला होता का, असा सवाल शेतकरी नेते संदीप भारमल यांनी उपस्थित केला
कागल तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. गावनिहाय पीकनुकसानीची पाहणी करून संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
बैठकीस सुरेश साळोखे,राणोजी गोधडे, अमोल मेटकर, संदीप भारमाल, कॉ. अशोक चौगले, चंद्रकांत हळदकर, नामदेव खंडागळे, विजय आढाव, राजू भारमाल, गजानन साळोखे, समाधान हेंदळकर, अण्णा कदम, पांडुरंग खंडागळे, राजाराम रावण, श्रीमंद महाजन, बबन बाबर, संदीप पाटील,सातापा मेटकर, शशिकांत चौगले, राम सातवेकर, गजानन मोरबाळे, केरबा खंडागळे, सचिन मेंडके, सचिन भारमाल, प्रकाश मेंडके, प्रशांत मोरबाळे, गौतम कांबळे, दत्तात्रय लोखंडे, संतोष मेंडके, सुनील परीट, उदय भोसले, राजबा भोसले, संतोष भोसले आदी उपस्थित होते.

No comments: