वेताळपेठेतील नाले हैदर आणि कुंभोजच्या हजरत पीर राजेबागस्वार पंजा यांची भेट.
वेताळपेठेतील नाले हैदर आणि कुंभोजच्या हजरत पीर राजेबागस्वार पंजा यांची भेट.

-------------------------------------------------------------
कुंभोज/प्रतिनिधी
विनोद शिंगे
------------------------------------------------------------
इचलकरंजी शहर व परिसरात मोहरम सणाची मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. बुधवारी कुंभोज (ता. हातकणंगले) येथील हजरत पीर राजेबागस्वार पंजा इचलकरंजीतील वेताळ पेठेतील नाले हैदर पंजा यांची मुलाखत (भेट) झाली. यावेळी मोठ्या संख्येने भागातील नागरिक उपस्थित होते.
वेताळ पेठ येथे अनेक वर्षांपासून मोहरम सणात परंपरेनुसार नाले हैदर पंजाची स्थापना करण्यात येते. अत्यंत जागृत व सर्वधर्म समभावाचे प्रतिक मानल्या जात असलेल्या या पंजाची स्थापना यंदा मोठ्या उत्साहात करण्यात आली. या पंजाच्या भेटीसाठी कुंभोज येथील हजरत पीर राजेबागस्वार पंजा दरवर्षी मुलाखतीसाठी येतो. यंदाही परंपरेनुसार या दोन्ही पंजांची भेट झाली.
इचलकरंजीत मंगळवारपासून मोहरम सणाची सुरुवात झाली आहे. शहरात विविध ठिकाणी वेगवेगळ्या पंजांची तर हजरत मख्तुमवली दर्गा आणि हजरत सिकंदर दर्गा याठिकाणी ताबुतची स्थापना करण्यात आली आहे. गुरुवार आणि शुक्रवार या दोन्ही दिवशी परंपरेनुसार शहरातील पंजांच्या भेटी होतील. तसेच सर्व पंजे दोन्ही दर्ग्यांना भेट देतील. शनिवारी खत्तलरात्र असून याचदिवशी नैवेद्य दाखविणे आणि रात्री खाई फोडण्याचा पारंपारिक कार्यक्रम होईल. रविवारी पहाटे शहर व परिसरातील सर्वच पंजे व ताबुत यांची गावभागात पारंपारिक पध्दतीने गाठीभेटी होतील आणि त्यानंतर सायंकाळी ताबुत विसर्जन होऊन मोहरमची सांगता होईल, अशी माहिती इचलकरंजी मोहरम कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे.
Comments
Post a Comment