लोकसहभागातून बर्की शाळा बनली सुंदर शाळा शिक्षकांच्या धडपडीला गावाची साथ.
लोकसहभागातून बर्की शाळा बनली सुंदर शाळा शिक्षकांच्या धडपडीला गावाची साथ.
--------------------------------------
शाहुवाडी प्रतिनिधी
आनंदा तेलवणकर
--------------------------------------
शाहूवाडी : तालुक्यातील बर्की हे गाव पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असून येथे पर्यटकांना आकर्षित करणारा धबधबा आहे . पर्यटनाचे आकर्षण, त्याचबरोबर भारतीय स्वतंत्र लढ्यातील सत्याग्रही विनोबाजी भावे यांच्या भूदान चळवळीतील बर्की हे गाव त्यामुळे आजही ग्रामपंचायत ऐवजी या गावात ग्रामदान मंडळच गावचा कारभार चालवते. त्यामुळे या गावाला ग्रामपंचायत सारखा निधी ही मिळत नाही.या गावात पहिली ते पाचवी पर्यंत वर्ग असणारी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. अपुऱ्या निधी अभावी या शाळेत भौतिक सुविधांची वाणवा होती. परंतु आवश्यक भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी या शाळेचे मुख्याध्यापक दशरथ आयरे व उपक्रमशील शिक्षक रवींद्र माने यांनी गावाला लोकसहभागाची हाक दिलीआणि शिक्षकांच्या या धडपडीला गावाने भरभरून साथ दिली. याच लोकसहभागाच्या आर्थिक मदतीतून शाळेची इमारत सुंदर सजवण्यात आली, आकर्षक चित्र रंगवलेल्या भिंती जणू चिमुकल्यांशी बोलू लागल्या, वर्गात सुंदर चित्र रेखाटले आहेत, विविध सुविचार, अभ्यासक्रमातील मजकूर, विविध कार्टून्स रेखाटन, यामुळे शालेय परिसर सुंदर आणि आकर्षक बनला आहे. लोकसहभागाच्या माध्यमातून संगणक, प्रिंटर, स्मार्ट टीव्ही, प्रोजेक्टर, अशा विविध भौतिक सुविधा शाळेत निर्माण केल्या आहेत. त्याचबरोबर परसबाग, शाळेसमोर बगीचा निर्मिती, शाळेसमोरील झाडांना आकर्षक ओटा बांधून कट्टा वाचनालय उपक्रम उत्कृष्टपणे राबवला आहे. शाळेत आजपर्यंत अधिकारी आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत न्यायाधीश, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यासारख्या अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत. गावाच्या मध्यभागी असणारी शाळेची इमारत सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. शाळेने राबवलेल्या विविध उपक्रमामुळे मुख्यमंत्री सुंदर शाळा अभियान अंतर्गत अनुस्कुरा केंद्रामध्ये बर्की शाळेने प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवले आहे. शिक्षकांचे प्रामाणिक प्रयत्न आणि गावकऱ्यांची साथ असेल तर जिल्हा परिषद शाळा समृद्ध होऊ शकते याचे बर्की शाळा हे मृतिमंत उदाहरण आहे. बर्की परिसराच्या निसर्गरम्य पर्यटनामध्ये आत्ता बर्कीची आकर्षक व सुंदर शाळा पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. लोकसहभाग मिळवण्यासाठी शिक्षकांच्या सह सर्व पालक, मुंबईमध्ये नोकरी निमित्त असणारे सर्व माजी विद्यार्थी, शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी, ग्रामदान मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या अनमोलाच्या सहकार्यामुळेच शाळेचे रूप पालटले आहे, शाळेतील शिक्षकांच्या प्रयत्नांचे आणि पालकांच्या धडपडीचे गटशिक्षणाधिकारी डॉ.विश्वास सुतार, शिक्षणविस्तार अधिकारी श्री.अनिल कुलकर्णी, श्री भगवान चौगुले, केंद्रप्रमुख श्रीकांत गुर्जर यांनी अभिनंदन केले

No comments: