१ ऑगष्ट" या अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मजयंती निमित्त, त्रिवार अभिवादन. अमरावती शहरात जयंती उत्सव साजरा.
१ ऑगष्ट" या अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मजयंती निमित्त, त्रिवार अभिवादन. अमरावती शहरात जयंती उत्सव साजरा.
----------------------------
अमरावती प्रतिनिधी.
पी एन देशमुख.
--------------------------------
अण्णा भाऊ साठे यांना महाराष्ट्रात, देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर साहित्यसम्राट, लोकशाहीर, लोक साहित्यिक, साहित्यरत्न, लेखक, विचारवंत, कवी, गायक....अशा अनेक उपाध्या ने ओळखले जाते. त्यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छासाठी, आठ दिवस आधीपासूनच गल्लीपासून मुंबई पर्यंत चौका-चौकात लागलेल्या फ्लेक्स, बॅनर, पोस्टर वरून दिसून येते.
अण्णा भाऊ यांचा जन्म १ ऑगष्ट १९२० रोजी वाटेगाव तालुका वाळवा, जिल्हा सांगली येथे ग्रामीण भागात झाला. अण्णा भाऊंचे पूर्ण नाव- तुकाराम भाऊराव साठे. केवळ दीड दिवस शाळेत गेलेल्या अण्णांनी ३८ कादंबऱ्या, १९ कथासंग्रह, ११ पोवाडे, १४ लोकनाट्ये, शेकडो लावण्या, कविता लिहून मराठी साहित्य क्षेत्रात एक आगळं वेगळं स्वतःचं स्थान निर्माण केलं. त्यांचे लिखाण म्हणजे ग्रामीण आणि शहरी भागातील झोपडपट्टीत राहणाऱ्या श्रमिक, कामगार, गरिबी आणि दारिद्र्यात जगणाऱ्या माणसांच्या दैनंदिन वास्तवाचे डोळ्यासमोर जीवंत चित्र उभे करणारं साहित्य. सामाजिक, राजकीय क्षेत्रात संघर्षाच्या वैचारिक "परिवर्तनवादी चळवळी" निर्माण करणारे साहित्य.--- "जग बदल घालून घाव, सांगुन गेले मज भिमराव! गुलामगिरीच्या या चिखलात, रुतुन बसला का ऐरावत! अंग झाडुनि निघ बाहेर, घे बिनीवरती घाव!" असे म्हणत ऐरावत म्हणजे हत्तीसारखी ताकद असलेल्या बहुजन समाजाला त्याच्या गुलामगिरीची, लाचारीची अन् स्वाभिमानाची जाणीव आठवण करून उठाव करण्यासाठी लेखणीतून प्रेरणा देतात.
एकजुटीच्या या रथावरती, आरुढ होवुनी चल बा पुढती! नव महाराष्ट्रा निर्मुन जगती,करी प्रकट निज नाव!" समता, स्वतंत्रंता, न्याय आणि बंधुभाव प्रस्थापित करण्यासाठी नव महाराष्ट्र निर्माणासाठी एकजुटीची हाक ते या बहुजन समाजाला देतात.
"माझी मैना गावाकडं राहीली, तिच्या जिवाची होते काहीली!"
अशा द्विअर्थानी पोवाडे, लावण्या गात "संयुक्त महाराष्ट्र चळवळीत" आख्खा महाराष्ट्र, मराठी मुलुख जागा केला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध देखील लोकजागृती निर्माण केली. पण स्वातंत्र्यानंतर दुसऱ्याच दिवशी १६ ऑगस्ट १९४७ रोजी दारिद्र्य, विषमता आणि उपासमारीने पछाडलेल्या कष्टकरी, गरिब, श्रमिकांच्या न्याय हक्कासाठी आपल्याच विषमतावादी व्यवस्थेविरुद्ध मुंबई येथील आझाद मैदानावर २० हजार कामगारांचा मोर्चा काढला आणि नारा दिला, "ये आजादी झुठी हैं। देश की जनता भूखी हैं।" देशासाठी, स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष करणाऱ्या कष्टकरी, गरिब, श्रमिकांची उपासमार होत असल्याने या खंतापोटी त्यांना मोर्चा काढावा लागला.
१९६१ च्या दरम्यान एक महिना अण्णा रशियाच्या दौऱ्यावर होते. तेव्हा त्यांनी रशियाच्या चौका-चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर पोवाडे गायले.*
*अण्णांचे तैलचित्र आणि पुतळे रशियात आहेत. अण्णांचे साहित्य जगातील ३८ देशात विविध भाषात प्रकाशित आणि अनुवादित झाले. अण्णांच्या साहित्यावर सात-आठ चित्रपट निघाले. अण्णांच्या फकिरा कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. अण्णांनी आपली "फकिरा" ही कादंबरी, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीला अर्पण केली. माकडीचा माळ, वारणेचा वाघ, वारणेच्या खोऱ्यात, आघात, आग, चित्रा, आवडी, वैजयंता, माझा रशियाचा प्रवास....... असे विपुल प्रमाणात साहित्य निर्माण करुन अजरामर झाले.
अण्णांना केवळ ४८ वर्षे ११ महिने आणि १७ दिवस एवढेच आयुष्य मिळाले.पण अण्णांचे नाव आणि केलेली क्रांती इतिहासात अजरामर राहील.
परत एकदा अण्णांना त्यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन.*
Comments
Post a Comment