शिरोळ तालुक्यातील नुकसानग्रस्त घटकांचा तातडीने पंचनामा करा : आमदार यड्रावकर
शिरोळ तालुक्यातील नुकसानग्रस्त घटकांचा तातडीने पंचनामा करा : आमदार यड्रावकर.
----------------------------
नामदेव भोसले
----------------------------
गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा व पंचगंगा नदीला आलेल्या पुरामुळे शिरोळ तालुक्यातील अनेक गावांत पूरस्थिती निर्माण झाली होती. आता धरण क्षेत्रातील पावसाचा जोर कमी झाल्याने व सर्वच धरणांचे दरवाजे बंद झाल्याने नदीपात्रातील पाणी ओसरू लागले आहे. महापुराचे पाणी मागे जात असताना पूरग्रस्त गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले चित्र समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तालुक्यातील महसूल विभागास तातडीने नुकसानग्रस्त घरांचा व शेतीचा पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.
यावेळी आमदार यड्रावकर म्हणाले शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेले नुकसान आणि नागरिकांच्या घरांचे झालेले मोठे नुकसान योग्यरीत्या नोंदवले जावे. यासाठी महसूल विभागाने तातडीने पंचनामे पूर्ण करून अहवाल शासनाकडे सादर करावा, जेणेकरून नुकसानग्रस्तांना शक्य तितक्या लवकर मदत मिळू शकेल.
पूर ओसरल्यानंतर गावोगाव कचरा, चिखल आणि अस्वच्छतेमुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे आरोग्य विभागाने प्रत्येक गावातील आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा मुबलक साठा ठेवावा, असे निर्देश आमदार यड्रावकर यांनी दिले. त्याचप्रमाणे गावागावात औषध फवारणी करून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी केल्या. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या सर्व सूचनांचे पालन करावे. सरकार व प्रशासन पूरग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. पंचनाम्यांची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण होऊन नुकसानग्रस्तांना मदत मिळावी, यासाठी संबंधित विभागांनी गतीमान काम करावे, असे आदेश आमदार यड्रावकर यांनी दिले आहे.

No comments: