शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा बँक व सोसायट्यांची बहुआयामी भूमिका – आमदार यड्रावकर.
शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा बँक व सोसायट्यांची बहुआयामी भूमिका – आमदार यड्रावकर.
---------------------------
नामदेव भोसले
---------------------------
विकास सेवा सोसायटीचे पदाधिकारी व सचिवांची आढावा बैठक संपन्न.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांची खरी अर्थवाहिनी असून शिरोळ तालुक्यातील सहकार क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावली आहे. गेल्या काही वर्षांत काटकसरी आणि पारदर्शक कारभारामुळे जिल्हा बँकेने तोटा भरून काढत देशातील अग्रगण्य बँकांमध्ये स्थान मिळवले. आज विकास सेवा सोसायट्यांमुळे शेतकऱ्यांची उन्नती होत आहे. पुढील काळात फक्त पीककर्जापुरत्या मर्यादित न राहता सोसायट्यांनी उद्योग, व्यापार, घरकर्ज अशा विविध क्षेत्रात पुढे यावे लागेल. शेतकऱ्यांच्या मुलांना उद्योजकतेकडे वळवून ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती होणे आवश्यक आहे. बँकेने कर्जवाटपात लवचिक धोरण घेतले असून कोणतीही विकास सेवा सोसायटी बंद होणार नाही, सहकार चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावे, असे आवाहन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.
शिरोळ तालुका विकास सेवा सोसायटीच्या पदाधिकारी व सचिवांची आढावा बैठक इदगाह मैदान जयसिंगपूर येथे पार पडली. यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर बोलत होते.
बैठकीच्या सुरुवातीला स्वागत व प्रास्ताविकानंतर उपस्थित मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर विविध पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अपात्र कर्जमाफी मुद्दल व मुद्दला इतकेच व्याज संस्थेला मिळाल्याबद्दल आभार मानण्यात आले.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक केडीसीचे विभागीय अधिकारी प्रभाकर मोरे यांनी केले.
यावेळी चंद्रकांत जोंग,राजेंद्र रावण, केरीपाळे, अजित देसाई, रामचंद्र मोहिते, महादेव धनवडे, वसंत देसाई, जगन्नाथ जाधव, प्रदिप चौगुले, अनिल पाटील, रमेश भुजूगडे, दिलीप पाटील, बाळासो कुंभार, सुरगोंडा पाटील, प्रकाश तिपण्णावर, दिलीप मगदूम मुसा इनामदार आदींनी उपस्थित केलेल्या शंकेचे निरसन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, सहाय्यक निबंधक उर्मिला राजमाने, केडीसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी.एम. शिंदे, शेती कर्ज विभागाचे व्यवस्थापक राजु पाटील यांनी सर्व संस्थांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांना समर्पक मार्गदर्शन केले.
यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर पुढे म्हणाले, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना मिळणाऱ्या अनुदानावरती जिल्हा मध्यवर्ती बँक महिलांच्या उन्नतीसाठी कर्ज उपलब्ध करून देणार आहे याचा लाभ महिला वर्गाने घ्यावा, असे आवाहन करून आमदार यड्रावकर पुढे म्हणाले, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक ही अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांची खरी अर्थवाहिनी ठरली आहे. शिरोळ तालुक्यातील सहकार क्षेत्राचा पाया बळकट करण्यामध्ये या बँकेची महत्वाची भूमिका राहिली आहे. हरितक्रांतीच्या काळात जिल्हा बँकेच्या सहकार्याने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे.
शिरोळ तालुका हा नेहमी ठेवीमध्ये कर्जवाटप व वसुलीमध्ये जिल्ह्यात एक नंबरला राहिला आहे याबद्दल संस्था प्रतिनिधींचे व जिल्हा बँकेचे कर्मचारी व सेवा संस्थांचे सचिव यांचे मनापासून आभार मानले.
आज ही बँक वसुली आणि कर्ज वितरणात राज्यातील अग्रगण्य बँकांपैकी एक ठरली आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँक एआय टेक्नॉलॉजीसाठी अनुदान देणारी पहिली बँक आहे.
शेतकऱ्याला समृद्धीकडे नेण्याचे काम जिल्हा मध्यवर्ती बँक करत आहे. विकास सेवा सोसायट्या या जिल्हा मध्यवर्ती बँकेचा कणा आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्हा बॅक काम करते, शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचं काम जिल्हा बॅक काम करत आहे. जिल्हा बँक इतर राष्ट्रीय बँकांच्या तुलनेत शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देते, हे पटवून देण्याची जबाबदारी सोसायटींच्या सचिव व संचालकांवर असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
घरबांधणी कर्जाची मर्यादा १० लाखांवरून ७५ लाखांपर्यंत वाढवण्यात आली असून, विविध व्यवसाय व उद्योगांसाठीही बँक कर्ज उपलब्ध करून देत आहे. विकास सेवा सोसायट्यांना कारखाने, उद्योग चालवण्याचे अधिकार असून या संस्थांना फक्त कर्जपुरते न ठेवता बहुआयामी कामे करण्याचे आवाहन त्यांनी केले. कोणतीही सोसायटी बंद होऊ नये आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत सहकार्याची मदत पोहोचावी, यासाठी जिल्हा बँक कटिबद्ध असल्याचा विश्वास आमदार यड्रावकर यांनी विकास सेवा सोसायट्यांच्या मेळाव्यात व्यक्त केला.
बैठकीत जनतेच्या अपघात विमा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना विमा रक्कम प्रदान करण्यात आले. कवठेगुलंद शाखेशी संलग्न विकास सोसायटीचे सभासद महावीर धनपाल शिरढोणे यांचे अपघाती निधन झाले होते. त्यांच्या वारसदार श्रीमती पुष्पा महावीर शिरढोणे यांना इफको टोकीयो इन्शुरन्स कंपनीकडून विमा संरक्षित रक्कम रु. २ लाख देण्यात आली.
सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कारही यावेळी करण्यात आला. यामध्ये आर.डी. कांबळे (दानोळी), प्रदीप देसाई (कुरुंदवाड), बबन गावडे (शिरोळ) व लक्ष्मण कलगी (दत्तवाड) या निवृत्त कर्मचाऱ्यांचा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी सावकर मादनाईक, रामचंद्र डांगे, सुभाषसिंग रजपूत, रणजितसिंह पाटील,केशव राऊत, सुरेश शहापुरे, आप्पासाहेब लठ्ठे, जयपाल कुंभोजे, एन.डी. पाटील,रणजित पाटील, प्रमोद पाटील, बाबा पाटील, विजयसिंह देशमुख यांच्यासह शिरोळ तालुक्यातील सर्व सेवा संस्थांचे चेअरमन, संचालक पदाधिकारी, सचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बबन यादव यांनी केले.
Comments
Post a Comment