विद्यार्थ्यांनी बदलत्या संशोधनाचा ध्यास घ्यावा: डॉ.संदीप वाटेगावकर.
विद्यार्थ्यांनी बदलत्या संशोधनाचा ध्यास घ्यावा: डॉ.संदीप वाटेगावकर.
---------------------------
जयसिंगपूर प्रतिनिधी
नामदेव भोसले
---------------------------
संशोधनामध्ये नवनवीन बदल होत चालले आहेत, या क्षेत्रात नव्या दिशा, पद्धती यांची दिवसेंदिवस भर पडत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बदलत्या संशोधनाचा ध्यास घ्यावा असे प्रतिपादन किसन वीर महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक व संशोधन व विकास समितीचे संचालक डॉ.संदीप वाटेगावकर यांनी केले.
जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयामध्ये प्राणीशास्त्र विभागाच्यावतीने 'संशोधनातील सध्याचे कल' या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ गुरुनाथ फगरे होते. याप्रसंगी प्राणीशास्त्र व रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. (डॉ.) ज्ञानदेव झांबरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. वाटेगावकर यांनी स्पष्ट केले की, सध्या जागतिक स्तरावर कर्करोगावरील संशोधन मोठ्या प्रमाणात सुरू असून स्तन कर्करोगावरील प्रभावी लस विकसित करण्यासाठी शास्त्रज्ञ अथक प्रयत्न करीत आहेत. ड्रग डिलिव्हरी सिस्टीम्स, नॅनोटेक्नॉलॉजी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रातील झपाट्याने होणारे बदल संशोधनाच्या नव्या दिशा निश्चित करत आहेत. आंतरविद्याशाखीय व समाजाभिमुख संशोधन हीच काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा व संशोधनाचा वापर समाजासाठी करायला हवा. शिक्षण घेत असतानाच प्रत्येक गोष्टीत वैज्ञानिक दृष्टीकोन अवगत करायला हवा. आंतरशाखीय संशोधनाचे महत्त्व तसेच शाश्वत व समाजाभिमुख संशोधनाची वाढती गरज विद्यार्थ्यांनी ओळखायला हवी'
प्रास्ताविकामध्ये बोलताना प्रा.(डॉ) झांबरे यांनी या व्याख्यानाचा उद्देश स्पष्ट करीत संशोधनातील नैतिकता, संशोधन निधीच्या संधी, संशोधनातील संधी, आव्हाने व महत्व इत्यादी विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
पाहुण्यांची ओळख प्रा. राहुल तायडे यांनी करून दिली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ.अश्विनी शेवाळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. राहुल तायडे, डॉ.अश्विनी शेवाळे व प्रा. शरद चव्हाण यांनी परिश्रम घेतले
Comments
Post a Comment