Header Ads

गारीवडे आरोग्य केंद्राच्या प्रतीक्षेत धामणी खोरा धुंदवडे खोरीतील युवकांचे आरोग्यमंत्र्यांना निवेदन.

 गारीवडे आरोग्य केंद्राच्या प्रतीक्षेत धामणी खोरा धुंदवडे खोरीतील युवकांचे आरोग्यमंत्र्यांना निवेदन.


-------------------------------

गगनबावडा प्रतिनिधी 

सुनिल मोळे

--------------------------------

गगनबावडा:- गारीवडे (ता. गगनबावडा) येथे उभारण्यात आलेले प्राथमिक आरोग्य केंद्र अनेक महिन्यांपासून सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहे. तालुक्यातील नागरिकांनी याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही आरोग्य विभागाने दिरंगाई केल्याने सर्वसामान्य जनतेत तीव्र नाराजी आहे. आता मात्र धामणी खोऱ्यातील युवा वर्गाने राज्याचे आरोग्यमंत्री नाम. प्रकाश आबिटकर यांना निवेदन देऊन तात्काळ आरोग्य केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे.


गारीवडे व आसपासची अनेक गावे डोंगराळ भागात वसलेली असल्याने तेथील सर्वसामान्यांना वेळेत आरोग्य सुविधा मिळणे कठीण जात आहे . लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाला साध्या आजारासाठीसुद्धा तालुक्याच्या ठिकाणी धाव घ्यावी लागते. पावसाळ्यात रस्त्यांची दयनीय अवस्था असल्याने रुग्णांना दवाखान्यात नेणे धोकादायक ठरते. या पार्श्वभूमीवर गारीवडे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला गेला होता. इमारत बांधून पूर्णही झाली आहे; मात्र आवश्यक सुविधा व कर्मचारी वर्गाची नेमणूक न झाल्याने आरोग्य केंद्र अजूनही सुरू झालेले नाही.


नागरिकांचे म्हणणे आहे की, आरोग्य केंद्रासाठी लागणारा खर्च शासनाने केला असूनसुद्धा लोकांना त्याचा प्रत्यक्ष फायदा होत नाही. सध्या गावात एखादा रुग्ण गंभीर आजारी पडला तर त्याला ४०ते ५० किलोमीटर अंतरावर कोल्हापूर किंवा गगनबावडा येथे न्यावे लागते. त्यामुळे वेळेअभावी रुग्णांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता निर्माण होते. या संदर्भात ग्रामस्थांनी आरोग्य विभागाला अनेक वेळा निवेदने दिली, बैठका घेतल्या; मात्र ठोस निर्णय होत नसल्याने संताप वाढत चालला आहे.


शासनाने गारीवडे केंद्र तात्काळ सुरू करून आवश्यक डॉक्टर, नर्स व औषधांचा पुरवठा करावा. सर्वसामान्यांना आरोग्यसेवा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी

कंदलगाव पोलीस पाटील दीपक कदम, तेजस भुतल अमर भूतल दिलीप भूतल , वैभव भूतल , धोंडीराम भूतल,दिगंबर भूतल किरण भूतल उपस्थित होते.


चौकट


 गारिवडे आरोग्य केंद्राची इमारत बांधून तयार झाली असून देखील आवश्यक त्या सुविधा व कर्मचारी उपलब्ध नसल्याने अद्यापही स्थलांतरित झालेले नाही. प्रशासनाने याची दखल घेत सर्वसामान्यांना तात्काळ आरोग्य सुविधा देण्यासाठी आरोग्य केंद्र स्थलांतरित करावे.

महेश देसाई

सामाजिक कार्यकर्ते


चौकट 


आरोग्यमंत्री लक्ष घालणार ?


ग्रामस्थांनी या प्रश्नावर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी निवेदने दिली,बैठका घेतल्या. मात्र प्रत्येक वेळी केवळ आश्वासने मिळालीत. यामुळे राज्याचे आरोग्यमंत्री नाम. प्रकाश आबिटकर या प्रश्नाकडे विशेष लक्ष देऊन गारिवडे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करून धामणी खोऱ्याचा आरोग्याचा प्रश्न सोडवणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


कोल्हापूर विभाग.

No comments:

Powered by Blogger.