Header Ads

कागल अनंत रोटो परिसरात गव्यांचा वावर; शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान!

 कागल अनंत रोटो परिसरात गव्यांचा वावर; शेतकऱ्यांच्या शेतीचे  नुकसान!

------------------------------

सुपर भारत- सलीम शेख 

-----------------------------

कागल (कोल्हापूर): कागल येथील अनंत रोटो परिसरात पुन्हा एकदा गव्यांचा  वावर दिसून आला असून, कागल येथील अनंत रोटो मधील श्रीराम सेवक नगर परिसरात गव्यांनी शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान केले आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पहाटे अंदाजे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. श्रीराम सेवक नगर परिसरात राहणारे शेतकरी संदीप माळी यांच्या बंगल्याजवळच्या शेतात कुत्री जोरजोरात भुंकू लागल्याने त्यांना जाग आली. माळी यांनी खिडकीतून बाहेर डोकावून बॅटरी पाडली असता, त्यांना चार मोठ्या जंगली जनावरांसारखे प्राणी दिसले. काही वेळाने हे प्राणी शेतातून पुढे निघून गेले.

संदीप माळी यांनी त्वरित परिसरातील शेतकऱ्यांकडे चौकशी केली की कोणाची जनावरे सुटली आहेत का? मात्र, कोणाचीही जनावरे सुटली नसल्याची खात्री झाल्यावर त्यांनी पाहिलेले प्राणी हे गवेच असल्याचा संशय व्यक्त केला.

रात्रभर हे गवे परिसरात फिरत होते, ज्याचे ठसे सकाळी शेतात स्पष्टपणे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे जगदाळे यांनी आज सकाळी परिसराची पाहणी केली. पाहणीमध्ये आढळून आलेले पायाचे ठसे हे गव्यांचेच असल्याची त्यांनी पुष्टी केली.

गव्यांच्या वावरामुळे परिसरातील शेतकरी संदीप माळी यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस आणि इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि पुढील नुकसानीला आळा घालण्यासाठी वन विभागाने तातडीने परिसरात  गस्त (पेट्रोलिंग) सुरू केली आहे व कॅमेरेही लावण्यात आले.

कागल परिसरात यापूर्वीही गव्यांचा वावर दिसून आला आहे. बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनेनंतर आता गव्यांच्या या कळपामुळे कोल्हापूर येथील स्थानिक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

No comments:

Powered by Blogger.