कागलच्या राजकारणाला मोठा कलाटणीबिंदू! मुश्रीफ-घाटगे एकाच व्यासपीठावर; नव्या राजकीय समीकरणांची नांदी!.
कागलच्या राजकारणाला मोठा कलाटणीबिंदू! मुश्रीफ-घाटगे एकाच व्यासपीठावर; नव्या राजकीय समीकरणांची नांदी!.
--------------------------------------
सलीम शेख
--------------------------------------
कागल (कोल्हापूर): राजकारणात कुणी कायम शत्रू नसतो, हे आज कागलमध्ये अक्षरशः सिद्ध झाले. गेली अनेक दशके कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ आणि भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांनी कागलच्या रणांगणात एकत्र येत संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणाला मोठा धक्का दिला आहे. कागल नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन दिग्गज नेत्यांनी एकत्र येत, केवळ कार्यकर्त्यांनाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला बिनआवाजी राजकीय बॉम्ब टाकून नव्या राजकीय समीकरणांची अधिकृत घोषणा केली आहे.कागल शहरातील मिटकरी हॉलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत आणि त्यानंतरच्या कार्यकर्ता मेळाव्यात, दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन पुढील वाटचालीची सविस्तर भूमिका स्पष्ट केली. कार्यकर्त्यांनी घोषणांचा जल्लोष करत प्रवेश केला. यावेळी मुश्रीफ-घाटगे यांनी स्पष्ट केले की, वरिष्ठांच्या मर्जीनुसार आणि कागलचा विकास हाच या एकत्र येण्यामागचा मुख्य हेतू आहे. भविष्यात सर्व निवडणुका एकत्र लढवून तालुक्याचा विकास साधायचा असल्याचे त्यांनी सांगितले.कागलच्या राजकारणाचे वैशिष्ट्य म्हणजे नेते बदलले, पण गट-तट मात्र कायम राहिले. या दोन नेत्यांच्या वैरामुळे अनेक कार्यकर्त्यांनी आपापसात डोकी फोडली, नाती-गोती तुटली आणि मित्रमंडळी वेगळी झाली. मात्र, आज त्याच दोन नेत्यांनी एकत्र येऊन कार्यकर्त्यांना मोठा धक्का दिला आहे.
या धक्कादायक युतीमुळे कार्यकर्त्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे स्वागत करत समतेच्या बाजूने उभे राहण्याची भूमिका घेतली, तर काही जुने निष्ठावान कार्यकर्ते मात्र नाराज असल्याची चर्चा नागरिकांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे. नागरिक या अनपेक्षित युतीवर चहा-नाश्त्याच्या टपरीवर चर्चा करताना एकमेकांना गमतीने विचारत होते, "या चहामध्ये साखर कोणत्या कारखान्याची? शाहू साखर कारखान्याची (घाटगे) की सेनापती घोरपडे साखर कारखान्याची (मुश्रीफ)?" यावरून ही युती किती अनपेक्षित आहे, याची कल्पना येते. तर कागल मधील काही नागरिकांनी अपक्ष उमेदवाराला मतदान करणार निर्णय घेतला आहे अशी चर्चा वेगवेगळ्या चौकात होत होती.या युतीमुळे कागलच्या दशकेभर चालत आलेल्या गटतटीच्या राजकारणाला मोठा कलाटणीबिंदू मिळाला आहे. नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने सुरू झालेली ही नवी राजकीय इनिंग, भविष्यात विधानसभा आणि इतर निवडणुकांमध्येही कायम राहणार असल्याचे संकेत दोन्ही नेत्यांनी दिले आहेत.
या युतीचा जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
या राजकीय भूकंपामुळे कागलमध्ये आता नेमके कोणते बदल होतील. हा येणारा काळच ठरवेल.

No comments: