Header Ads

अवैध पिस्तूल टोळीचा साताऱ्यात फडशा – गुन्हे प्रकटीकरण शाखेची धडाकेबाज कारवाई, तिघे जेरबंद!


अवैध पिस्तूल टोळीचा साताऱ्यात फडशा – गुन्हे प्रकटीकरण शाखेची धडाकेबाज कारवाई, तिघे जेरबंद!


सातारा जिल्हा प्रतिनिधी – अमर इंदलकर

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना सातारा तालुका पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अवैध अग्निशस्त्रांचा साठा राखणाऱ्या टोळीवर धडक कारवाई करून तिघा आरोपींना जेरबंद केले. या कारवाईत दोन देशी बनावटीची पिस्तुले व एक दुचाकी असा एकूण १ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. निवडणूक पार्श्वभूमीवर संभाव्य गुन्हेगारी कारवायांना आळा घालणारी ही कारवाई ठरली आहे.


सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की वाडेफाटा येथील अमर हॉटेल समोर एक इसम दुचाकीवर थांबलेला असून त्याच्याकडे पिस्तूल सदृश अग्निशस्त्र आहे. मिळालेल्या माहितीचे गांभीर्य ओळखून गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदारांनी तात्काळ वाडेफाटा परिसरात पाळती घालण्यास सुरुवात केली.


दरम्यान, अमर हॉटेलसमोर माहितीतील वर्णनाशी जुळणारा इसम मोटारसायकलवर संशयास्पदरीत्या बसलेला पोलिसांना दिसून आला. पथकाने तत्काळ त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून देशी बनावटीचे एक पिस्तूल आढळून आले. सदर शस्त्र बाबत कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे उघड झाले. प्राथमिक चौकशीत त्याने हे पिस्तूल दुसऱ्या एका इसमाकडून मिळविल्याची कबुली दिली.


यानंतर पोलिसांनी कौशल्यपूर्ण पद्धतीने नमूद दुसऱ्या संशयिताचा ठावठिकाणा मिळवून त्यालाही ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींना सातारा तालुका पोलीस ठाण्यात आणून सखोल चौकशी करण्यात आली असता त्यांच्या ताब्यातील पिस्तुलासंदर्भात कोणताही परवाना नसल्याचे समोर आले.


पुढील तपासात या दोघांकडून आणखी एका इसमाचे नाव निष्पन्न झाले. त्यानंतर गुन्हे शाखेने तिसऱ्या संशयिताचा शोध घेत कौशल्याने त्यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून आणखी एक देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले.


या धडाकेबाज कारवाईत सातारा तालुका पोलिसांनी –


अंदाजे ६०,००० रुपये किमतीची २ देशी बनावटीची पिस्तुले


६०,००० रुपये किमतीची मोटारसायकल



असा एकूण १,२०,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.


सदर आरोपींची नावे पुढीलप्रमाणे –


1. राज धनाजी घाडगे, रा. आंबवडे, ता. कोरेगाव, जि. सातारा



2. ओंकार सोमनाथ साखरे, रा. मेढा, ता. जावळी, जि. सातारा



3. गणेश विष्णुदास धनावडे, रा. करंजे, ता. जावळी, जि. सातारा




अवैध अग्निशस्त्रे बाळगणे, साठवणे व त्याचा गैरकायदेशीर वापर टाळण्यासाठी संबंधित कायद्यांनुसार सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई सुरू आहे.


ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी सपोनि विनोद नेवसे, पोउनि सोनू शिंदे तसेच पोलीस अंमलदार दादा स्वामी, मनोज गायकवाड, पंकज ढाणे, राजु शिखरे, प्रदिप मोहिते, मालोजी चव्हाण, संदीप आवळे आणि दप्तरी सतीश बाबर, प्रविण वायदंडे, सुनिल भोसले यांनी या कारवाईत मोलाची भूमिका बजावली.


या धडाकेबाज ऑपरेशनमध्ये सहभाग नोंदवणाऱ्या सर्व अधिकारी व अंमलदारांचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी विशेष कौतुक करून अभिनंदन केले आहे.

No comments:

Powered by Blogger.