कर्नाटक राज्यात पसार झालेल्या रिक्षा चोराला सातारा डीबी पथकाने १२ तासांत केली अटक
कर्नाटक राज्यात पसार झालेल्या रिक्षा चोराला सातारा डीबी पथकाने १२ तासांत केली अटक.
--------------------------------------सातारा जिल्हा प्रतिनिधी – अमर इंदलकर.
----------------------------------------
मौजे कोडोली (ता. सातारा) येथे पहाटेच्या सुमारास घरासमोर उभी असलेली रिक्षा अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली. रिक्षा मालकाने गावात तसेच आजूबाजूच्या परिसरात स्वतः शोध घेतला; मात्र रिक्षा न मिळाल्याने त्याने सातारा शहर पोलीस ठाण्यात रिक्षा चोरीची फिर्याद नोंदवली.
तक्रार दाखल होताच सातारा शहर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे प्रकटीकरण (डीबी) पथकाने जलद गतीने तपास सुरू केला. रेकॉर्डवरील एका संशयिताची गुन्हेगारी पार्श्वभूमी, तो नेहमी बसत-उठत असलेली ठिकाणे, त्याचे सहकारी, राहण्याच्या जागांबाबतची माहिती गोळा करण्यात आली. या माहितीच्या आधारे संशयित कर्नाटक राज्यात पळून जाण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
सदर चोरटा मोबाईल फोन वापरत नसल्याने त्याचा लोकेशनवरून माग काढणे शक्य नव्हते. त्यामुळे त्याचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. तरीदेखील डीबी पथकाने संशयिताचा फोटो सीमाभागासह विविध ठिकाणी दाखवून माहितीदार जाळे सक्रिय केले. दरम्यान मिळालेल्या ठोस माहितीच्या आधारे कर्नाटकमधील एका मंदिर परिसरात तो दिसल्याची खबर मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या परिसरात सापळा रचून संशयितास ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपीने रिक्षा सातारा शहरातच सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवल्याची कबुली दिली. आरोपीच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी त्या ठिकाणाहून चोरीस गेलेली रिक्षा हस्तगत करून जप्त केली.
या प्रकरणी आरोपी गोपाळ शिवाजी पवार (रा. गोपाळ वस्ती, अजंठा चौक, सातारा) यास अटक करण्यात आली असून सातारा शहर पोलीस ठाण्यात रिक्षा चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवघ्या १२ तासांत रिक्षा चोरटा गजाआड केल्याने सातारा पोलिसांच्या तत्पर व अचूक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक मा. डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग राजीव नवले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे व पथकातील पो.हवा. निलेश यादव, सुजीत भोसले, निलेश जाधव, विक्रम माने, प्रवीण कडव, पो.ना. पंकज मोहिते, पो.कॉ. तुषार भोसले, सागर गायकवाड, सचिन रिटे, संतोष घाडगे, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, आशिकेष डोळस, वैभव माने, सुशांत कदम, सुहास कदम यांनी केली.

No comments: