बालिंग्यात अवैध गर्भलिंग तपासणी आणि बेकायदेशीर गर्भपात प्रकरण; दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल.
बालिंग्यात अवैध गर्भलिंग तपासणी आणि बेकायदेशीर गर्भपात प्रकरण; दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल.
------------------------------------------
कागल प्रतिनिधी
सलीम शेख
------------------------------------------
कोल्हापूर: करवीर तालुक्यातील बालिंगा परिसरात अवैधरीत्या गर्भलिंग तपासणी आणि अनधिकृत गर्भपात करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर प्रकरणी दोन संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता सह वैद्यकीय गर्भपात कायदा संबंधित कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही महत्त्वपूर्ण कारवाई २४ नोव्हेंबर २०२५ रोजी करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, २४ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी बालिंगा येथील प्लॉट नंबर टि ९, गट नंबर ४१ ब या ठिकाणी संशयित व्यक्ती कोणत्याही कायदेशीर परवान्याशिवाय पोर्टेबल सोनोग्राफी मशीनचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले. या माध्यमातून ते मुलगा किंवा मुलगी याची बेकायदेशीर माहिती देण्याचा आणि अनधिकृत गर्भपात करण्याचा प्रयत्न करत होते. हा प्रकार अत्यंत गंभीर आणि कायद्याचे उल्लंघन करणारा असल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन कठोर कारवाई केली.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे २,२८,३१०/- किमतीचे साहित्य जप्त केले आहे. यामध्ये पोर्टेबल सोनोग्राफी मशीन (किंमत अंदाजे ₹१,५०,०००/-), सोनोग्राफी प्रोब, जेल बॉटल, एक मोबाइल फोन (किंमत अंदाजे २०,०००/-) आणि गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचे ९८ पॅकेट किंमत ५८,३१०/ यांचा समावेश आहे.
या प्रकरणी संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, वैद्यकीय गर्भपात कायदा , वैद्यकीय गर्भपात रेग्युलेशन आणि महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम अशा विविध कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दाखल अंमलदार म्हणून मुल्ला आणि तपास अधिकारी टकले हे पुढील तपास करत आहेत. याची फिर्याद डॉक्टर उत्तम मदने यांनी दिली आहे.पोलिस तपास चालू असून या बेकायदेशीर कृत्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

No comments: