Header Ads

संभापुरात गंभीर हल्ला; एकाचा मृत्यू.

 संभापुरात गंभीर हल्ला; एकाचा मृत्यू.

 

----------------------------------------

कोल्हापूर प्रतिनिधी

 शशिकांत कुंभार 

----------------------------------------

कोल्हापूर: संभापूर येथे मद्यधुंद अवस्थेत जेवणाच्या वेळी झालेल्या वादातून गंभीर हल्ला होऊन ३५ वर्षीय मंगळ विभीषण मांझी यांचा मृत्यू झाला.  सोमवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान ही घटना घडली असून पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.


हातकणंगले तालुक्यातील टोप येथील अजित अवघडी शिसाळ यांच्या संभापूर गावच्या हद्दीतील बिरदेव मंदिराच्या पिछाडीस शेती असून या ठिकाणी बांधलेल्या खोल्यांमध्ये काही मजूर भाड्याने राहतात. याच ठिकाणी मूळ ओडिशा राज्यातील व सध्या संभापूर येथे राहणारे मंगळ विभीषण मांझी (वय ३५) गवंडी काम करीत होते. त्यांच्या कुटुंबीय ओडिशामध्ये राहतात.

सोमवारी दुपारी भाड्याच्या खोलीत २५ वर्षीय संशयित देवश्री प्रफुल चंदन (मूळ ओडिशा) हा राहायला आला होता. तो पूर्वी गंधर्व फाट्याच्या भागात राहत होता. तेथेही वाद झाल्याने त्याला तेथून हटविण्यात आले होते, अशी प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.

रात्री जेवण करताना मंगळ मांझी आणि देवश्री चंदन यांच्यात वाद झाला. वाद तीव्र झाल्यानंतर संशयिताने हातातील धारदार वस्तूने मंगळ मांझी यांच्यावर हल्ला केला. स्वतःचा बचाव करण्यासाठी ते बाहेर पळाले, मात्र संशयिताने त्यांचा पाठलाग करून वार केल्याची माहिती साक्षीदारांकडून मिळाली आहे.

आरडाओरड ऐकून तेथील कामगार धावून आले. यातील संजय निहाल यांनी हल्ला थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या हातावरही जखम झाली. जखमींना तातडीने सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मंगळ मांझी यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच शिरोली एमआयडीसी पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक विभागाची मोबाइल फॉरेन्सिक व्हॅनही तपासासाठी दाखल झाली. पोलिसांनी संशयित देवश्री प्रफुल चंदन याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

No comments:

Powered by Blogger.