मध्यप्रदेशात बनावट नोटांचा आरोपी शिक्षक अटकेत भोपाळच्या फ्लॅटमध्ये नोटांचा कारखाना; अमरावतीसह नागपूर, धुळे, मालेगाव कनेक्शन उघड.
मध्यप्रदेशात बनावट नोटांचा आरोपी शिक्षक अटकेत भोपाळच्या फ्लॅटमध्ये नोटांचा कारखाना; अमरावतीसह नागपूर, धुळे, मालेगाव कनेक्शन उघड.
----------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
पी. एन. देशमुख
----------------------------------
मध्यप्रदेशातील भोपाळ येथे गोकुलधाम सोसायटीमधील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या बनावट नोटांच्या कारखान्यावर पोलिसांनी सिनेसृष्टीला साजेशी अशी कारवाई करत धाड टाकली. या कारवाईत खंडवा येथील मुख्य सूत्रधारासह तीन जणांना अटक करण्यात आली असून, अटकेतील एक आरोपी हा अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेचा प्रभारी मुख्याध्यापक असल्याचे समोर आले आहे.
खंडवा जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज कुमार राय यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने रविवारी (दि. 23 नोव्हेंबर) ही कारवाई केली. या प्रकरणाच्या धागेदोरे थेट महाराष्ट्रातील नागपूर, धुळे, मालेगावपर्यंत पोहोचत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून बनावट नोटांचे मोठे नेटवर्क उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे –
डॉ. प्रतीक सुरेश नवलाखे, रा. बुरहानपूर (मुख्य सूत्रधार)
गोपाल उर्फ राहुल मांगीलाल पवार, रा. हारदा
दिनेश दीपक गोरे, प्रभारी मुख्याध्यापक, रा. साईनगर, धारणी, जि. अमरावती
चौकशीदरम्यान आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, जेलमध्ये झालेल्या ओळखीमधूनच या बनावट नोटांच्या रॅकेटची गुंफण झाली. भोपाळ येथील गोकुलधाम सोसायटीतील फ्लॅटमध्ये बनावट नोटा छापल्या जात होत्या, तर औरंगाबाद रोडवर "ट्रॅव्हल्स नामा" नावाने कंपनी चालवून त्याच्या आड हा गोरखधंदा सुरू होता, असा धक्कादायक खुलासा समोर आला आहे.
प्राथमिक तपासात आतापर्यंत सुमारे ४० लाख रुपयांच्या बनावट नोटा छापल्याची कबुली आरोपींनी दिली असल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. या रॅकेटचे संबंध नागपूर, धुळे, मालेगावसह राज्यातील विविध भागांतील व्यवहारांशी जोडले गेल्याचा संशय पोलिसांना असून पुढील चौकशीदरम्यान आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या कारवाईमुळे अमरावती जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात एकप्रकारे खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषद शाळेतील प्रभारी मुख्याध्यापकच बनावट नोटा प्रकरणात अटकेत गेल्याने पालक व शिक्षकवर्गात तीव्र चर्चा सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, महाराष्ट्रातील रॅकेटचे नवे धागेदोरे आणि आणखी कोणकोण सहभागी आहेत, याबाबत पोलीस पथक सखोल तपास करीत आहे.

No comments: