Header Ads

जिल्हा परिषद–पंचायत समिती मतदार यादीला पुन्हा मुदतवाढ मतदार यादी आता २७ नोव्हेंबरला; इच्छुक उमेदवारांचा पुन्हा हिरमोड!

 जिल्हा परिषद–पंचायत समिती मतदार यादीला पुन्हा मुदतवाढ मतदार यादी आता २७ नोव्हेंबरला; इच्छुक उमेदवारांचा पुन्हा हिरमोड!

---------------------------

राज्य प्रतिनिधी

---------------------------

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीला पुन्हा एकदा ब्रेक बसला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदार यादीला आणखी एकदा मुदतवाढ देण्यात आली असून ही यादी आता येत्या गुरुवारी, २७ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. या नव्या घडामोडीमुळे निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या इच्छुकांचा पुन्हा एकदा हिरमोड झाला असून, राजकीय वर्तुळात संताप व नाराजीच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.


राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव सु.तु. आरोलकर यांच्या स्वाक्षरीने सोमवारी दुपारी संबंधित आदेश पत्रक पाठवण्यात आले. या पत्रकातून मतदार यादीच्या प्रकाशनाला मुदतवाढ देत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. परिणामी जिल्हा परिषदेच्या ५९ आणि पंचायत समितीच्या ११८ मतदार संघातील नेमके मतदार किती, या महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर आजही मिळू शकलेले नाही.


आयोगाने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार ही यादी गेल्या महिन्यातच जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र तांत्रिक आणि प्रक्रियात्मक कारणांचा आधार देत यादी प्रकाशनाला सतत मुदतवाढ देण्यात येत आहे. आजच्या निर्णयानुसार ही मतदार यादी आता २७ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार असल्याचे निवडणूक यंत्रणेने स्पष्ट केले आहे.


मतदार यादी तयार करण्यासाठी बूथनिहाय मस्टर तसेच मतदान केंद्रनिहाय चार्ट ऑनलाइन अपलोड करणे आवश्यक आहे. दरम्यान, बूथनिहाय मतदार तपशील प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने आणि यादीचे प्रिंट काढताना अनेक जिल्हाधिकारी कार्यालयांना अडचणी येत असल्याची माहिती आयोगापर्यंत पोहोचली. याच कारणावरून मतदार यादीच्या प्रकाशनाला मुदतवाढ देण्यात आल्याचे आयोगाच्या पत्रात नमूद आहे.



---


१४ पंचायत समित्यांच्या निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष


राज्यातील ३२ जिल्हा परिषद व त्या अंतर्गत असलेल्या ३६ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसोबतच अमरावती जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील तब्बल १४ पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून विविध राजकीय पक्ष, तसेच समाजकारणात अग्रसर असलेले संभाव्य उमेदवार, स्थानिक नेतेमंडळी यांनी प्रचारयोजना, गटबांधणी व संपर्क मोहीम यांची जोरदार तयारी सुरू केली होती.


मात्र मतदार यादीच वेळेवर जाहीर न झाल्याने अनेकांनी केलेली मेहनत ‘अनिश्चिततेच्या गर्तेत’ अडकली आहे. मतदारसंख्या, बूथनिहाय समीकरण, नवे मतदार आणि आरक्षणाचे गणित यावर आधारित रणनीती ठरवायची असताना अद्याप अंतिम चित्र स्पष्ट झाले नाही. त्यामुळे “निवडणूक येतेय, पण यादी कधी येणार?” असा सवाल इच्छुक उमेदवार आणि पक्ष कार्यकर्त्यांतून विचारला जात आहे.


सततच्या मुदतवाढींमुळे निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची कुजबूज राजकीय पातळीवर सुरू असून, पुढील काही दिवसांत या मुद्यावरून निवडणूक आयोगाला स्पष्टीकरण देण्याची मागणी जोर धरू शकते, अशीही चर्चा आहे.

No comments:

Powered by Blogger.