Header Ads

अर्जुनवाडा येथे कुशन जाळण्याच्या विरोधात ग्रामस्थांचे रस्ता रोको आंदोलन.

 अर्जुनवाडा येथे कुशन जाळण्याच्या विरोधात ग्रामस्थांचे रस्ता रोको आंदोलन.

---------------------

राधानगरी प्रतिनिधी – विजय बकरे.

--------------------


राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा गावात गुऱ्हाळ घरांमध्ये पेटवण्यात येणाऱ्या कुशनमुळे निर्माण झालेल्या प्रदूषणाविरोधात ग्रामस्थांचा रोष अखेर उफाळून आला. आरोग्याच्या गंभीर प्रश्नांचा निषेध आणि कुशन तसेच प्लास्टिक जाळण्यावर बंदी घालावी, या मागणीसाठी आज (गुरुवारी) सकाळी अर्जुनवाडा बसस्टॉप येथे ग्रामस्थांनी कोल्हापूर–गारगोटी राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.


गावातील नागरिकांनी सांगितले की, गेल्या दीड वर्षांपासून गुऱ्हाळ घरांमध्ये कुशन जाळल्याने प्रचंड धूर, दुर्गंधी आणि रासायनिक घटकांमुळे हवा व पाणी दोन्ही प्रदूषित झाले आहे. परिणामी श्वसनाचे विकार, त्वचारोग, डोळ्यांचे आजार वाढले असून काही नागरिकांना कॅन्सरसारखे घातक आजारही झाले आहेत. या प्रदूषणामुळे गावातील ओढे, नाले आणि विहिरींचे पाणी दूषित झाले असून, रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे.


या पार्श्वभूमीवर आठ दिवसांपूर्वी ग्रामसभेत गाव बंद ठेवून रास्ता रोको करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने देऊनही कोणतीच कारवाई झाली नाही, अशी ग्रामस्थांची नाराजी व्यक्त करण्यात आली.


आज सकाळी ११ वाजता झालेल्या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राधानगरी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.


या वेळी प्रभारी तहसीलदार सतीश ढेंगे यांनी आंदोलनस्थळी येऊन ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारले. “या प्रकरणाचा निपटारा पंधरा दिवसांच्या आत केला जाईल,” असे आश्वासन त्यांनी दिले.


रस्ता रोको आंदोलनावेळी अर्जुनवाडा गावचे नूतन उपसरपंच पैलवान नामदेव चौगुले, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी रोहिदास मातकर, राधानगरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष गोरे, उपनिरीक्षक आकाश भोसले, शिवसेनेचे नेते अरविंद पाटील, चंद्रे गावचे सरपंच प्रभाकर पाटील, अजित पाटील, नेताजी वाघरे, दिनेश माने, बाबुराव तिकोडे, बाळासो पाटील, वाकोजी चौगुले, विश्वनाथ पाटील, संदीप पाटील, राजेंद्र यादव आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.

No comments:

Powered by Blogger.