Header Ads

कागल नगरपरिषदेच्या वतीने नामदार गोपाळकृष्ण गोखले शाळेतून 'मतदार जागृती अभियान' फेरी!

 कागल नगरपरिषदेच्या वतीने नामदार गोपाळकृष्ण गोखले शाळेतून 'मतदार जागृती अभियान' फेरी!


-------------------------------

सलीम शेख 

-------------------------------

कागल  : कागल नगरपरिषद आणि शिक्षण विभागाच्या वतीने शहराच्या लोकशाही प्रक्रियेला बळकटी देण्यासाठी एक स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. कागल शहरातील नऊ शाळांपैकी एक असलेल्या नामदार गोपाळकृष्ण गोखले आझाद चौक या शाळेमधून आज मतदार जागृती अभियान फेरी मोठ्या उत्साहात काढण्यात आली. शाळेच्या परिसरातील गल्ल्यांमधून काढण्यात आलेल्या या फेरीमुळे संपूर्ण परिसर उत्साहाने दुमदुमून गेला होता.

या अभियानात शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मोठ्या हिरीरीने सहभाग घेतला. त्यांच्या हाती 'मतदान आपला हक्क आहे', 'मतदार राजा जागा हो', 'मतदान करा, लोकशाही मजबूत करा' अशा आशयाचे फलक होते आणि त्यांनी जोरदार घोषणा देत परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले.

फेरीसोबतच शाळेमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मतदान जागृती करण्यासाठी तसेच संविधानाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी 'संविधान', 'भारत माता', 'लाल किल्ला' अशा आकर्षक रांगोळ्या काढून जनजागृती मोहीम पार पाडण्यात आली. याशिवाय, वकृत्व स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांच्या विचारांना व्यासपीठ मिळाले, तसेच आजचा दिवस बालदिन म्हणूनही साजरा करण्यात आला.

या मतदार जागृती अभियान आणि बालदिन कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक सागर नदाफ, तसेच शुभांगी गाडेकर, सचिन गाडेकर, संतोष पाटील, पिष्टे सर, दिपाली मिठारे, सुवर्णा सोनुले, शिपाई शकील ताशिलदार आणि इतर सर्व कर्मचारी वर्ग आवर्जून उपस्थित होते.

या संपूर्ण अभियानातून विद्यार्थी आणि शिक्षक यांनी मिळून नागरिकांमध्ये मतदानाचे महत्त्व आणि लोकशाहीतील त्यांचे योगदान याबद्दल प्रभावी संदेश पोहोचवला.

No comments:

Powered by Blogger.