हिंद-दी-चादर कार्यक्रमात तृतीयपंथी समुदायाकडून सेवा उपक्रम; एकता-समानतेचा संदेश.
हिंद-दी-चादर कार्यक्रमात तृतीयपंथी समुदायाकडून सेवा उपक्रम; एकता-समानतेचा संदेश.
-----------------------------
नांदेड प्रतिनिधी
अंबादास पवार
-----------------------------
नांदेड येथे पार पडलेल्या हिंद-दी-चादर या भव्य धार्मिक कार्यक्रमात नांदेडच्या सर्व तृतीयपंथी समुदायाच्या वतीने फळे व बिस्किटांचे वाटप करून एकता, समानता व बंधुतेचा संदेश देण्यात आला. या उपक्रमासाठी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल तृतीयपंथी समुदायाने सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन व आभार व्यक्त केले.
तृतीयपंथी समुदायातून व्यक्त झालेल्या प्रतिक्रियेनुसार, “सामान्यतः धार्मिक कार्यक्रमांमध्ये आम्ही लोकांकडून मागण्याची व त्यांना आशीर्वाद देण्याची परंपरा आहे. मात्र आज एवढ्या मोठ्या समागमामध्ये आम्हाला सेवा करण्याची, आशीर्वादरूपी व प्रसादरूपी योगदान देण्याची संधी मिळाली, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. आमच्याकडून जे काही चांगले घडले, ते घडवून आणण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो,” अशी भावना तृतीयपंथी समुदायातून व्यक्त करण्यात आली.
हा उपक्रम तृतीयपंथी कल्याण महामंडळाच्या उपाध्यक्ष तथा सप्तरंग सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा डाॅ. सान्वी जेठवाणी तसेच नरसी नायगाव येथील तृतीयपंथी गुरु व किन्नर विकास परिषद, देवगिरी प्रांताच्या संयोजिका फरीदा बकश यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमस्थळी सेवा स्टॉल उभारण्यात आला होता.
या उपक्रमात नांदेडच्या गादीपती गुरु रंजिता नायक तसेच गौरी देवकर, अर्चना बकश, जया बकश, बिजली बकश आणि कमल फाउंडेशनचे अमरदीप गोधने यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.
याशिवाय किन्नर समुदायातील शुभांगी राठोड, प्रिया पवार, सीमा बकश, शुभ्रा पाटील, चमेली बकश, छकुली, गणेश पांचाळ, हरीश काळे, सोनी, गोरी, इरम, शिवाजी हंबर्डे आदी सदस्य या सेवा उपक्रमात सक्रियपणे सहभागी झाले होते.
या उपक्रमामुळे धार्मिक कार्यक्रमांमध्ये तृतीयपंथी समुदायाचा सन्मानाने सहभाग वाढत असून, समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणाऱ्या समावेशकतेचा संदेश नांदेडमधून देण्यात आला, अशी भावना उपस्थितांमध्ये व्यक्त होत होती.

No comments: