बालिंगे गावात नागरी सुविधांचा बोजवारा; पाणी व कचरा व्यवस्थेवर ग्रामस्थ संतप्त.
बालिंगे गावात नागरी सुविधांचा बोजवारा; पाणी व कचरा व्यवस्थेवर ग्रामस्थ संतप्त.
निश्चित वेळापत्रक नसल्याने नागरिक त्रस्त; ग्रामपंचायतीला निवेदन, आंदोलनाचा इशारा.
*************************
📍 करवीर (कोल्हापूर) प्रतिनिधी :
*************************
करवीर तालुक्यातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या बालिंगे गावात सध्या नागरी सुविधांची गंभीर अवस्था निर्माण झाली आहे. गावातील पाणीपुरवठा व कचरा संकलन व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून, नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागत आहे.
गावात पाणीपुरवठ्याचे कोणतेही निश्चित वेळापत्रक नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. अनेकदा सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा पाणी सोडले जात असल्याने गृहिणींना तासनतास पाण्यासाठी वाट पाहावी लागते. तसेच नोकरी करणाऱ्या नागरिकांनाही याचा मोठा फटका बसत आहे.
दरम्यान, स्वच्छतेच्या बाबतीतही परिस्थिती चिंताजनक बनली आहे. गावात कचरा संकलनासाठी येणाऱ्या घंटागाडीची वेळ निश्चित नसल्याने नागरिकांना वेळेत कचरा देणे शक्य होत नाही. परिणामी अनेक ठिकाणी रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचून दुर्गंधी पसरत असून सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर परिवर्तन सेवा संस्थेच्या वतीने ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. प्रत्येक प्रभागासाठी पाणीपुरवठा आणि घंटागाडीचे निश्चित दिवस व वेळ ठरवून ते ग्रामपंचायत फलकावर तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या वेळी परिवर्तन सेवा संस्था अध्यक्ष सौ. अमृता पाटील, मेघा ढेंगे, सीमा ढेंगे, स्नेहल पाटील, रामचंद्र पाटील, अनिकेत पाटील व अतुल ढेंगे उपस्थित होते.

No comments: