कॉमर्स विद्यार्थ्यांवर शासनाचा घाला?” प्रशासकीय पदभरतीतील नव्या नियमांविरोधात कोल्हापुरात संतप्त विद्यार्थ्यांचे आंदोलनात्मक निवेदन.
“कॉमर्स विद्यार्थ्यांवर शासनाचा घाला?”
प्रशासकीय पदभरतीतील नव्या नियमांविरोधात कोल्हापुरात संतप्त विद्यार्थ्यांचे आंदोलनात्मक निवेदन.
--------------------------------------कोल्हापूर प्रतिनिधी : विजय बकरे.
---------------------------------------
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने ५ मे रोजी जाहीर केलेल्या नव्या प्रवेश नियमांमुळे वाणिज्य (Commerce) शाखेच्या विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, या निर्णयाविरोधात कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. गट-अ, गट-ब आणि गट-क संवर्गातील तांत्रिक व विशेष कौशल्याधारित पदांसाठी इतर शाखांतील उमेदवारांनाही पात्र ठरवण्याच्या निर्णयामुळे वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
विद्यार्थ्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, लेखापरीक्षण (Accounting), अंकेक्षण (Audit) आणि करप्रणाली (Taxation) हे विषय पूर्णपणे वाणिज्य शाखेशी निगडित असून, या विषयांचे सखोल ज्ञान वाणिज्य पदवीधरांकडेच असते. अशा परिस्थितीत संबंधित पदांसाठी इतर शाखांतील उमेदवारांना संधी दिल्यास प्रशासनातील कामाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
“विशिष्ट शैक्षणिक पात्रता आणि कौशल्य आवश्यक असलेली पदे सर्वांसाठी खुली करणे म्हणजे वाणिज्य शाखेच्या अस्तित्वालाच धोका निर्माण करण्यासारखे आहे,” अशी तीव्र भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. अनेक वर्षे संबंधित विषयांचा अभ्यास करूनही रोजगाराच्या संधी हिरावल्या जात असल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर शासनाने ५ मे रोजीच्या नियमावलीत तातडीने सुधारणा करून वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या शिष्टमंडळात शुभम पाटील, रोहित शिपुकडे, प्रसाद जाधव, नवनाथ चव्हाण, शरद पाटील, मोहम्मद शेख, सचिन आठबैले, निलेश बिरजे, किरण पाटील, अनिल जाधव, रोहन जाधव, अमर पाटील, विकास पाटील, गुरुदेव सोनार, सुमित गवळी आणि अक्षय जाधव आदी विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

No comments: